इटॉन इंडिया फाउंडेशन तर्फे पुण्यातील रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांसाठी लसीकरण मोहीम

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

समाजाला सशक्त बनवण्याची बांधिलकी जपण्यासाठी उर्जा व्यवस्थापन कंपनी, इटॉनने आज पुणे महानगरपालिकेबरोबर (पीएमसी) आणि रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल यांच्या सहकार्याने सहा महिन्यांची कोविड लसीकरण मोहीम सुरू करत असल्याचे जाहीर केले. इटॉन इंडिया फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या सार्वजनिक व खासगी क्षेत्राच्या (पीपीपी) भागिदारीच्या माध्यमातून वंचित घटकांना लाभ करून दिला जाणार असून त्यात ट्रक कम्युनिटी, रोजंदारीवर काम करणारे, स्थलांतरित मजूर, अपंग व्यक्ती यांचा समावेश असेल.

महामारीविरोधातल्या देशाच्या लढाईसाठी इटॉन अखंडितपणे योगदान देत आहे, असे इटॉनच्या वाहन समूहाचे व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र शुक्ला म्हणाले. ‘या अनोख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तब्बल 15,000 जणांचे मोफत लसीकरण करणार आहोत. हा उपक्रम फिरता आणि समाजातील वंचित घटकांना सहज उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही आमच्या भागिदारांचे आभारी आहोत,’ असेही ते म्हणाले.

‘आम्ही इटॉन आणि पीएमसीच्या सहकार्याने चालती-फिरती मोबाइल लसीकरण व्हॅन चालवून लस सेवा देणार आहोत,’ असे व्हॅक्सिनऑनव्हील्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जिग्नेश पटेल म्हणाले. ‘समाजातील लोकांपर्यंत लस थेट पोहोचवल्याने रोगप्रतिकारक्षमता वाढेल आणि पर्यायाने विषाणूचा प्रसार रोखण्यास मदत होईल.’

‘या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही जास्तीत लोकांना लस देणार असून हा आजार होण्याची जास्त शक्यता असलेल्यांवर आम्ही भर देणार आहोत,’ असे रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रलच्या कोविड लसीकरण प्रकल्पाचे अध्यक्ष रवी कपूर म्हणाले. ‘या महत्त्वाच्या उपक्रमासाठी इटॉनबरोबर सहकार्य करताना आम्हाला आनंद होत आहे.’

इटॉन इंडिया फाउंडेशन हा सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट इटॉनची भारतातील समाजोपयोगी कामांची व्याप्ती वाढवण्यासाठी स्थापन करण्यात आला होता. इटॉन इंडिया फाउंडेशनने आतापर्यंत कोविडशी संबंधित विविध उपक्रमांसाठी सहाय्य केले असून त्यात फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना आरोग्यसेवा व सुरक्षा उपकरणे पुरवणे, स्थलांतरित आणि रोजंदारीवर काम करणाऱ्यांना जेवण, अन्नधान्य किट्स पुरवणे यांचा समावेश आहे. इटॉनच्या सीएसआर आणि समाजोपयोगी कामांमध्ये विशिष्ट आराखड्याचे पालन केले जाते व संबंधित उपक्रम निधी, वस्तूरूपी योगदान, स्वयंसेवक उपक्रम, तांत्रिक सहकार्य यांच्या माध्यमातून ना- नफा तत्वावर काम करणाऱ्या संस्थाच्या मदतीने दीर्घ काळ व दूरवर पोहोचेल याची खात्री केली जाते.


Share this Newz