The Newz Biz Team, PUNE
राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील नाराजांना हेरायला सुरुवात केली आहे. भाजपच्या पिंपळे गुरव येथील विद्यमान नगरसेविका चंदा लोखंडे यांचे पती आणि माजी नगरसेवक, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती राजू लोखंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घडवून आणून याची सुरुवात केली आहे.
राजू लोखंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शुक्रवारी प्रवेश केला. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजपला चांगलाच धक्का बसला आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ पिंपरी चिंचवड विभागाचे माजी अध्यक्ष विजयआण्णा जगताप, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, स्थायी समितीचे माजी सभापती अतूल शितोळे आदी उपस्थित होते.
याबाबत बोलताना माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी सांगितले, की आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजू लोखंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेला प्रवेश महत्त्वाचा आहे. ही फक्त सुरूवात आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपला अनेकजण कंटाळले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या मार्गदर्शनाखाली काही दिवसात 25 ते 30 नगरसेवक, तर चिंचवड विधानसभेतून 10 ते 15 भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. आज सांगवी, पिंपळे गुरव भागात भाजपचे 12 नगरसेवक आहेत. यातील 3 ते 4 नगरसेवकांसह अनेक कार्यकर्ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. हे प्रवेश पिंपळे गुरवमध्ये भव्य कार्यक्रमात होणार आहेत.







Leave a Review