The Newz Biz Sport Team
भारताचा सुपरस्टार खेळाडू नीरज चोप्राने दमदार कामगिरी करीत टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारतासाठी टोकियो ऑलिम्पिकमधील हे पहिलेच सुवर्णपदक ठरले. दरम्यान, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नीरज चोप्रा याचे अभिनंदन करीत सहा कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
नीरज चोप्राने पहिल्याच राऊंडमध्ये 87.03 मीटर लांब भाला फेक करत आघाडी मिळवली. पहिल्या दोन फेऱ्यांपासून नीरज चोप्रा आघाडीवर होता. दुसऱ्या फेरीत नीरज चोप्राने फेकलेल्या थ्रोची आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली.
त्याने भालाफेकीत धडाकेबाज सुरुवात केली. पहिल्याच प्रयत्नात 87.03 मी इतका भालाफेक केला. दुसऱ्या फेरीत नीरज चोप्राने 87.58 मी इतका लांब भाला फेक करुन आपले पहिले स्थान कायम ठेवले. नीरज चोप्राने तिसऱ्या थ्रोमध्ये 76.79 मीटर थ्रो फेकला. तर, चौथा थ्रो फाऊल ठरला. नीरजने टाकलेला पाचवा थ्रो देखील फाऊल ठरला आहे. सहाव्या फेरीत नीरजने 84 मीटर थ्रो फेकला. टोकिओ ऑलिम्पिकमधील आणि भालाफेकीत मिळणारे हे भारतातील पहिले सुवर्णपदक ठरले आहे.
नीरज चोप्रा हा हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यातील खांद्रा गावातील आहे. भालाफेक या खेळाची कोणतीही पार्श्वभूमी त्याच्या गावात नव्हती. सुरुवातीच्या काळात नीरज चोप्रा इतरांप्रमाणे क्रिकेट खेळत होता. त्याने मार्च 2021 मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टस पटियाळा येथे 88.07 मीटर इतक्या अंतरावर भाला फेकला होता. 2018 मध्ये आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक मिळवले होते. त्यावेळी त्याने 88.06 मीटर भाला फेकला होता.
हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांकडून 6 कोटी जाहीर
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नीरज चोप्राचे कौतुक केले. तसेच हरियाणा सरकारच्या वतीने 6 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. नीरज चोप्राची इच्छा असल्यास त्याला क्लास वन दर्जाची नोकरी देऊ, अशी घोषणा देखील त्यांनी केली आहे.







Leave a Review