घोलप महाविद्यालयाचा रॉस लाईफ सायन्सेस सोबत सामंजस्य करार

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृतीला चालना मिळावी आणि त्यांना सार्वजनिक आरोग्याचे महत्व माहिती व्हावी, या उद्देशाने प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या संकल्पनेतून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील पर्यावरणशास्त्र संशोधन केंद्र आणि औषध निर्माण क्षेत्रातील नामांकित रॉस लाईफ सायन्सेस इंडिया प्रा. लि. यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

बाबुरावजी घोलप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे व रॉस लाईफ सायन्सेस इंडिया चे संचालक डॉ. केदार देवभानकर यांनी या करारावर स्वाक्षरी केली. यावेळी उपप्राचार्य डॉ. लतेश निकम, पर्यावरणशास्र संशोधन केंद्राच्या समन्वयक चंदा हासे, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वैशाली बनसोड आदी उपस्थित होते.

या सामंजस्य कराराचे महत्व स्पष्ट करत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी सामंजस्य करारामुळे बौद्धिक क्षमतांची देवाण घेवाण होत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत होईल, असे मत व्यक्त करत या सामंजस्य करारामुळे निर्माण होणाऱ्या संशोधनाच्या संधी कडे लक्ष वेधले. तसेच आरोग्य व जीवशास्त्र यामध्ये संशोधनाकरिता विद्यार्थी व प्राध्यापकांना या सामंजस्य कराराचा फायदा होणार असून विद्यार्थ्यांनी प्राप्त संधी मधून गुणवत्तापूर्ण संशोधन करण्यावर भर द्यावा, अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली.

विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षणा बरोबर संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देणे, एकत्रित सहकार्याने चर्चासत्र, कार्यशाळा, क्षेत्र भेट, प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे तसेच समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सहभाग घेणे, आदी उद्देशाने हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.
कोविड – १९ विषयक शासन नियमांचे पालन करत महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. वैशाली बन्सोड तर आभार प्रदर्शन डॉ.चंदा हासे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. राणी भगत, पल्लवि घारपुरे, प्रणित पावले यांनी विशेष सहकार्य केले.


Share this Newz