महावितरणने डी.पी. बॉक्स, ट्रान्सफार्मर रहिवाशी क्षेत्रापासून सुरक्षित अंतरावर करावेत : महापौर माई ढोरे

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

सर्वसामान्य नागरिकांचा जीविताचा विचार करून महावितरणने डी.पी. बॉक्स, ट्रान्सफार्मर हे रहिवाशी क्षेत्रापासून सुरक्षित अंतरावर करावेत, तसेच ट्रान्सफॉर्मरच्या आजूबाजूला वाढलेल्या झाडाच्या फांद्या छाटाव्यात, अशा सूचना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर माई उर्फ उषा ढोरे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केल्या.

महावितरण व पुणे जिल्हा विद्युत नियंत्रण समितीची बैठक विधानभवन विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पुणे जिल्ह्यातील विद्युत नियंत्रण समितीचे सदस्य बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध विद्युत विषयक अडीअडचणी समस्यांबाबत महापौर माई ढोरे यांनी सविस्तर माहिती देत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

महापौर माई ढोरे यांनी सांगितले, की सध्या पाऊस सुरू असल्यामुळे डी.पी.बॉक्स, ट्रान्सफार्मर, उघड्यावर असणाऱ्या वीजेच्या केबलमुळे नागरिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच ट्रान्सफॉर्मरच्या आजूबाजूला वाढलेली झाडे व झाडाच्या फांद्या छाटणे अत्यंत आवश्यक आहे.

यामुळे भविष्यात दुर्घटना अथवा अपघात टाळणे शक्य होणार असल्याचे, तसेच सध्या पावसाळ्यामध्ये वीजेच्या अनिश्चित व अनियमित पुरवठ्याबाबत देखील त्यांनी लक्ष वेधले.


Share this Newz