The Newz Biz Team, PUNE
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज दिल्ली येथे भेट झाली. पंतप्रधान कार्यालयात दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. सहकार खाते आणि बँकिंग विषयावर चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, दोन्ही नेत्यांमधील या भेटीचा तपशील समजू शकलेला नाही. दरम्यान, देवेंद्र फडणवीसही दिल्लीतच असल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
केंद्र सरकारने नव्याने निर्माण केलेले सहकार खाते, देशातील सहकाराचे प्रश्न, सहकार खात्याकडून असलेल्या अपेक्षा, बँकिंग, कृषी कायदे, शेतकरी आंदोलन आणि संरक्षणविषयक विषयांवर बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी काल पवारांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती, तर शरद पवार यांनी शुक्रवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती.
महाविकास आघाडी आणि राज्यात विरोधी पक्ष असलेला भाजप यांच्यातील संबंध दुरावलेले आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून तिढा निर्माण झाला आहे. केंद्राने मांडलेल्या कृषी कायद्यांसंदर्भातही मतभेद आहेत.
देवेंद्र फडणवीसही दिल्लीत
शरद पवार यांनी शुक्रवारी भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्याचवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीससुद्धा नवी दिल्लीतच होते. त्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.








Leave a Review