The Newz Biz Team, चौंडी
ज्ञानदेव नारायण शिंदे(पाटील), चोंडी यांच्या निधनाची बातमी समजली. थोडावेळ तर विश्वासच बसेना. अचानक कसे झाले, असे वाटू लागले. पण बातमी खरी होती. अतिशय दुःखद घटना आहे. खूप वाईट वाटले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली..!
भाऊंचे अचानक जाणे चोंडी गावाला, परिवाराला व समाजाला चटका लावणारे आहे. अतिशय निर्मळ मनाचा, सत्यशील, संयमी आणि प्रेमळ व्यक्ती आपल्यातून निघून गेला.
ज्ञानदेव नारायण शिंदे यांचा पाच भावंडांचा परिवार. दोन नंबरचे ज्ञानदेव नारायण शिंदे(पाटील). वडिलोपार्जित जमीन जुमला भरपूर असल्यामुळे मनापासून शेती करण्याचा छंद. प्रगतशील शेतकरी म्हणून पंचक्रोशीत ओळख. त्याचबरोबर व्यापार हा त्यांचा आवडता जोडधंदा. शेती आणि व्यापारामध्ये खूप प्रामाणिक काबाडकष्ट करून अल्पकाळात यश संपादन केले होते. कुणालाही बोलताना मोठ्या आवाजात बोलायचे, ती त्यांची खासियत होती. चोंडी गावात शिंदे घराण्याचे वजन आहे. भाऊच्या शब्दाला गावात किंमत होती. ती त्यांनी कमावली होती.
भाऊ अतिशय कर्तबगार आणि क्रियाशील होते. मुला-मुलींना जीवापाड जपणारा लहान मुलगा अशोकच्या कामाचं तोडभरून कौतुक असणारा बाप माणूस. हळव्या मनाचा, मनमिळाऊ, स्वभावाने अनेक गावकरी, समाजाला, पाहुण्यांना कुटुंबांना जवळचा वाटायचा.
समाजात जे ज्येष्ठ आहेत, त्यांना मान द्या. कारण तुम्हीपण कधीतरी म्हातारे होणार आहात. जे दुर्बल आहेत, त्यांना मदत करा. कारण कधीतरी तुम्हालाही गरज भासू शकते. एखाद्याने चूक केली, तर त्याला क्षमा करा. कारण तुम्ही सुद्धा कधीतरी चुकणार आहात, अशा स्वरूपाचे उदात्त विचार अंगीकारले होते.
भाऊंच्या व्यक्तिमत्त्वाविषयी सांगायचे झाले, तर भाऊ तुमच्याकडे पाहिल्यास कोणालाही तुमच्या तब्येतीचा हेवा वाटायचा. तुमचे व्यक्तिमत्व फार भारदस्त होते. जबरदस्त होते. पोषाख नेहमी स्वच्छ असायचा. उंच शरीरदृष्टी, पिळदार मिशा असा रांगडा हा गडी चार-चौघांत उठून दिसायचा. नेहमी हसतमुख चेहरा प्रसन्न बोलण्यात दम असायचा. आवाज इतका मोठा की समोरचा घाबरून जायचा. पण आवाजात व स्वभावात तेवढेच प्रेम असायचं. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची भाऊंची विशेष लकब होती. त्यावेळचा तुमच्या सोबतचा सहवास तुमचे स्नेही कधीच विसरू शकत नाही.
गावात आणि गावाबाहेर आपण अनेक माणसं जोडली, हे अगदी उत्तम सुरू होते. आपल्या जिवाभावाची माणसं, रक्ताच्या नात्यातील माणसं अर्ध्यात सोडून गेल्यास जीवनात पोकळी निर्माण होते. तसंच तुमचं झाल होतं. एक कर्ताधरता तरणाबांड थोरला मुलगा अरुणचे आकस्मित निधन झाल्यामुळे आपल्याला नेहमी दुःख असायचे. आपल्या आयुष्यात हे खूप मोठं दुःख आपण सहन केलं. आपल्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानादेखील आपण कुटुंबाला दुःखातून मोठ्या धीराने बाहेर काढले.
सगळं मोकळं-ढाकळं बोलणारा, मनात कसलीही आडकाठी न ठेवणारा, कुणाविषयी ही द्वेष मनात न ठेवणारा, काय असेल ते समोरा-समोर बोलून मोकळं होणारा माणूस तुम्ही हजारात एक होता..!
गाव समाज अडचणीत सापडलेलं असतानाच या कठीण काळात सामान्य लोकांच्या मदतीला धावून आलेले भाऊ नेहमी पाहिलेले आहेत. सहकार्याची भावना असलेला माणूस, शब्दाला जागणारा माणूस, शब्द पाळणारा माणूस, प्रामाणिक माणूस अशी स्वतःची ओळख निर्माण केलेला हा प्रगतशील शेतकरी माणूस चिरकाल आठवणीत राहील. सर्व समाजाच्या लोकांना आपुलकीने बोलणारा, खर्याला खरं, खोट्याला खोटे म्हणणारा, कुणाच्याही हाकेला धावून जाणारा, कोणाविषयी मनात राग न धरणारा, साधा-सरळ स्वभावाचा, सर्वांना हवा-हवासा वाटणारा हा एक ढाण्या वाघ होता. सगळ्या बाबतीत एक नंबर असलेला हा माणूस समाजाला, गावाला, नातेवाईक मंडळीला अजून हवा होता. भाऊ अचानक गेल्यामुळे गाव पोरके झाल्याची भावना सर्वस्तरातून उमटू लागली आहे. आप-आपसातले सगळे हेवे-दावे, गट-तट विसरून सगळ्या गावाने एकाच छत्राखाली एक झाले पाहिजे, असा विचार भाऊंचा होता. शेतीमध्ये फार चांगले प्रयोग सुरू होते. आधुनिक पद्धतीने शेती करण्यावर आपला नेहमी भर होता. शेतीबरोबर आपण व्यापारामध्ये अग्रेसर होता. आपल्या बोलीभाषेमुळे आपण प्रसिद्ध होता. बोलण्याची पद्धत योग्य असल्यामुळे आपल्याला कधीच कुठेच अडचण आली नाही. चोडी गावात शिंदे घराण्यातील अनेक हुशार मुल मोठे अधिकारी झाले, यांचा अभिमान भाऊना होता. स्वत: कमी शिकलेल्या भाऊना बहुजन समाजातील तरूण मुला- मुलींविषयी वाटायचे की खूप शिकले पाहिजे. शिकल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही, हे त्यांना समजले होते. दूरदृष्टीचा पुरोगामी विचार त्यांच्याकडे होता. हे त्यांच्या वागण्या बोलण्यातून जाणवते. एक सामाजिक कार्यकर्ता प्रगतशील शेतकरी, ढाण्या वाघ हरपला. यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील…!
मला असे वाटते की, तात्विक भांडण सर्वांशी होते, पण शत्रुत्व कुणाशीच ठेवू नये. खरंतर मतभेद एकमेकांशी असू शकतात. जरूर असावे, पण मनात कायम भेद ठेवू नये. एकादाशी वाद घालावा, पण वादावादी न करता क्षणात सुसंवाद साधावा. अंहकार हाच या सर्वांचे मूळ आहे. तो विनाकारण बाळूगुन जगू नये. शेवटी मृत्यू हे शाश्वत वास्तव आहे. त्याचे स्मरण असावे, भय नसावे. आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेल्या दिवसांचा आनंद घेण्यासाठी याचे स्मरण ठेवूया. आपण किती आनंदात आहोत, त्यापेक्षा आपल्यामुळे कितीजण आनंदात आहेत, याला खूप महत्त्व आहे. एक हृदय घेऊन आलोय, जाताना लाखो हृदयात जागा करून जाता आले पाहिजे.
सगळं-सगळं किती व्यवस्थित सुरू होते. मग अचानक असे कसे गेलात. फार दुःख होत आहे. तुमच्याविषयी श्रद्धांजलीपर भावना व्यक्त करताना आपल्या पश्चात आपल्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची देवाकडे प्रार्थना करतो. साश्रू नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली..!
प्रा. डॉ. बाळासाहेब सोनवणे, “राजगृह”नामदेव आंगण, चोंडी









Leave a Review