हॉटेल्स पूर्ण बंद करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाबद्दल हॉटेल व्यवसायिकांमधून नाराजी

बिबेवाडी- कोंढवा येथील गोकुळ रेस्टॉरंटचे मालक प्रियांक शाह यांची प्रशासनाच्या निर्बंधांबद्दल तीव्र नाराजी
Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

पुणे व पिंपरी शहराबरोबरच जिल्ह्यात सात दिवसांसाठी कडक निर्बंध लादत हॉटेल, रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. बिबेवाडी- कोंढवा येथील गोकुळ रेस्टॉरंटचे मालक प्रियांक शाह या निर्बंधांना विरोध करीत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

याविषयी बोलताना प्रियांक शाह म्हणाले, मागील वर्षभरात लॉकडाऊनचा परिणाम म्हणून शहरातील ४० % रेस्टॉरंट बंद झाली आहेत. जी सुरु आहेत त्यांचा ५०% सुद्धा व्यवसाय होत नाही. अशा परिस्थितीत आणखी ७ दिवस हॉटेल व रेस्टॉरंट पूर्ण बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय हा जाचक आहे. हॉटेल, रेस्टॉरंट चालकांना आज भाडे भरण्याची देखील अडचण असून, व्यवसाय करायचा कसा हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. अशी परिस्थिती असताना आजच्या बैठकीत लागलेल्या निर्बंधांमुळे आम्ही हवालदिल झालो आहोत. इतर व्यापार, भाजीमंडई, दुकाने सुरु असताना हॉटेल व रेस्टॉरंट पूर्णपणे बंद ठेवणे म्हणजे आमच्या क्षेत्रावर अन्याय करण्यासारखे आहे.

हॉटेल व्यवसायावर अनेकांचे पोट भरत असते. वेटर, आचारी, डिलिव्हरी बॉय, त्याचप्रमाणे हॉटेल व्यवसायावर किराणा दुकान, भाजी विक्रेता, डेअरी, उत्पादक आदींचाही व्यवसाय अवलंबून असतो. त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांना या निर्बंधातून सूट देण्यात यावी, अशी मागणी प्रियांक शाह यांनी राज्य सरकार आणि प्रशासनसकडे केली आहे. हॉटेल व्यवसाय टिकून राहण्यासाठी प्रयत्न करावा. पुणे शहरात सुमारे दहा ते बारा हजार हॉटेल व्यावसायिक आहेत. या निर्णयामुळे यांच्यावर उपासमारीची वेळ येईल आणि यांच्यासोबत जोडले गेलेल्या व्यक्तींवर उपासमारीची वेळ येईल.

लॉकडाऊनमुळे हॉटेल व रेस्टॉरंट क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. लॉकडाऊन संपला तरी आमच्यावर लागलेले निर्बंध मात्र कायम राहिले इतकेच नाही, तर ते अधिक कडक होत गेले. आम्हीही गेले वर्षभर तोटा सहन करीत काम करीत राहिलो. आता मात्र या क्षेत्राला टिकून राहणे देखील शक्य नाही. सरकारने घालून दिलेल्या प्रत्येक नियमांचे आम्ही काटेकोरपणे पालन करण्यास तयार असून, आम्हालाही व्यवसाय करायची संधी द्यावी, अशी मागणी यावेळी प्रियांक शाह यांनी केली.


Share this Newz