विजयराव भिसे यांचा लायन्स क्लबच्या वतीने विशेष सन्मान 

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

पिंपळे सौदागर येथील रहिवाशी व पिंपरी चिंचवड कल्चरल फाउंडेशनचे अध्यक्ष विजयराव भिसे यांनी क्लब सोबतच समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल लायन्स क्लब ऑफ पुणे चतुश्रृंगीच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.

भिसे यांनी महाविद्यालयात असल्यापासुनच समाजसेवेला सुरुवात केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रसेवादलामध्ये सुरुवातीला काम केले आहे. डुडुळगाव येथील लेप्रसी कैम्पमध्ये पीडितांची सुश्रुषा, ज्येष्ठ समाजसेविका सुधा कोठारी यांच्यासोबत ग्रामीण युवक संघटना विषयक काम, अकादमी फ़ॉर एज्यूकेशन अँड युथ सर्विसमध्ये योगदान, 1986 च्या बाबा आमटे यांच्या भारत जोड़ो अभियानात सहभाग, तळेगाव आणि पिंपरी येथे विभागीय साहित्य संमेलन, युवा कला संवर्धन  संस्थेची उभारणी करण्यात योगदान दिले.

त्या काळात विविध ठिकाणी कविसंमेलन, ग्राम युवक शिबिरे, स्व.आमदार अशोकराव तापकीर यांच्या उपस्थितीत चाकण जवळील महाळुंगे येथील शिबिर विशेष ठरले. तसेच अध्यात्म आणि कला, संगीत, नाटक, सिनेमा यातील सहभाग, पुणे येथील आशय फ़िल्म क्लबमधील गेली पस्तीस वर्षे असलेला सहभाग, बत्तीसहून अधिक वर्षे सातत्याने श्रवणलाभ घेतलेला सवाईगंधर्व महोत्सव अशा असंख्य कार्यक्रमांतील सहभाग आयोजन व नियोजनात त्यांचा पुढाकार आहे.

नुकतीच स्थापन केलेली पिंपरी चिंचवड कल्चरल क्लबची स्थापना, तसेच मानवतावादी भूमिकेतून केलेल्या इतर अनेक कामांची दखल घेत मानव संसाधन विकास संस्थेच्या वतीने नुकताच दिलेला समाजभूषण पुरस्कार या व इतर कामांची दखल घेत लायन्स क्लबने भिसे यांचा सन्मान केला. यावेळी क्लबचे प्रांतपाल अभय शास्त्री, क्लबचे अध्यक्ष अरुण खानोलकर, सुशीला चांडक, दिलीप पानसरे आदी उपस्थित होते.


Share this Newz