खेडमध्ये घरे बांधण्यासाठी एलजी इलेक्ट्राॅनिक्सतर्फे हॅबिटॅट फाॅर ह्युमॅनिटी इंडियाला पाठिंबा

Share this Newz

The Newz Biz Team Team, PUNE

अपुऱ्या क्षेत्रफळाच्या घरात राहणाऱ्या आणि सोयीसुविधांपासून वंचित असलेल्या कुटुंबियांना सध्याच्या महामारीच्या काळात स्वतःच्याच घरामध्ये राहणे हे असुरक्षित किंवा अशक्य झाले आहे. अल्प-उत्पन्न गटातील कुटुंबांना पुरेशा गृह आणि स्वच्छताविषयक सुविधा पुरविणाऱ्या गृहक्षेत्रातील सामाजिक संस्था हॅबिटॅट फाॅर ह्युमॅनिटी इंडिया बरोबर एलजी इलेक्ट्राॅनिक्सने भागीदारी केली आहे.

लाईफ इज गुड होप व्हिलेज या उपक्रमाद्वारे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात असलेल्या खेड गावामध्ये १२ कुटुंबांना घर बांधून देण्यात येणार आहे तर १५ कुटुंबांना स्वच्छतागृह बांधून देण्यात येणार आहेत. घर बांधून देण्याबरोबरच पाणी शुद्धीकरण यंत्र आणि रेफ्रिजिरेटरसारखी उपकरणेही खेड येथील खारोशी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बसविण्यात येणार आहेत. हा उपक्रम पुढील दहा महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे.

एलजी इलेक्ट्राॅनिक्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक युंग लॅक किम म्हणाले, लोकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न एलजीने सातत्याने केला आहे. त्यामुळेच हॅबिटॅट फाॅर ह्युमॅनिटी इंडिया करीत असलेल्या चांगल्या कामाला पाठिंबा देताना आम्हाला आनंद होत आहे. आरोग्यदायी गृह पर्यायांद्वारे कुटुंबियांची जीवनशैली उंचावली जाते आणि त्यांचे सामाजिक संरक्षण केले जाते.

हॅबिटॅट फाॅर ह्युमॅनिटी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राजन सॅम्युएल म्हणाले, कोव्हिड-१९ पासून संरक्षण देणारी पहिली फळी म्हणून आम्ही बांधलेल्या घरांची गणना होते आहे. तरीही सध्याच्या महामारीच्या काळात काही जणांसाठी सुरक्षित आणि परवडेल अशी घरे मिळणे हे स्वप्नच राहिले आहे. आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाताना पिडीत कुटुंबांना आरोग्यदायी घरे देऊन सक्षम करण्याचे काम हॅबिटॅट फाॅर ह्युमॅनिटी इंडिया संस्थेकडून केले जाते. कोव्हिड-१९ महामारीमुळे सर्वांच्या आणि विशेषतः वंचितांच्या आयुष्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळेच खेड येथे राबवित असलेल्या उपक्रमाला एलजी इलेक्ट्राॅनिक्सने पाठिंबा दिल्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे. या उपक्रमामुळे त्या कुटुंबांना सध्याच्या विपरित परिस्थितीतही चांगली आरोग्यदायी घरे मिळतील.


Share this Newz