The Newz Biz Team, Pune
देना बॅंक व विजया बॅंक यांच्या एकूण 3898 शाखांचे एकत्रिकरण / स्थलांतर करून घेण्याचे काम ‘बॅंक ऑफ बडोदा’ने पूर्ण केले आहे. देना बॅंकेच्या 1770 शाखांचे एकत्रिकरणाचे काम ‘बॅंक ऑफ बडोदा’ने या डिसेंबर 2020 मध्ये पूर्ण केले. विजया बॅंकेच्या 2128 शाखांच्या एकत्रिकरणाचे काम ‘बॅंक ऑफ बडोदा’ने सप्टेंबर 2020 मध्येच पूर्णत्वास नेले होते. अशा प्रकारे, देना व विजया या दोन्ही बॅंकांचे एकत्रिकरण ‘बॅंक ऑफ बडोदा’मध्ये होण्याची प्रक्रिया ठरलेल्या मुदतीपेक्षा अगोदरच पूर्ण झाली आहे. या विलिनीकरणामुळे, बॅंक ऑफ बडोदा ही मालमत्तेच्या दष्टीने देशातील सार्वजनिक क्षेत्रातील तिसरी मोठी बॅंक झाली आहे.
हे विलिनीकरण खऱ्या अर्थाने मोठे आहे. या प्रक्रियेमध्ये 5 कोटींहून अधिक ग्राहकांची खाती स्थलांतरीत करण्यात आली. शाखांचे एकत्रिकरण करण्याबरोबरच, सर्व एटीएम, पीओएस मशीन्स व क्रेडिट कार्ड्स यांचेदेखील स्थलांतर यशस्वीपणे पूर्ण झाले. विलिनीकरणानंतर आता सर्व ग्राहकांना देशभरातील एकूण 8248 देशांतर्गत शाखा व 10318 एटीएम यांचा वापर करता येणार आहे. ‘बॅंक ऑफ बडोदा’ची सर्व प्रकारची उत्पादने व सेवा यांचा लाभ या सर्व ग्राहकांना घेता येईल. तसेच, या सर्वांना ‘बडोदा कनेक्ट’, ‘एम-कनेक्ट प्लस’ यांसारख्या सुलभ, वापरण्यास सोप्या व शाखांमध्ये मिळू शकणाऱ्या वैशिष्ट्यांनी युक्त अशा सुविधा मिळू शकणार आहेत. त्यांना घरबसल्या बॅंकिंगच्या सेवा उपभोगता येणार आहेत.
ज्या ग्राहकांची खाती स्थलांतरीत झाली आहेत, त्यांना आपला नवीन खाते क्रमांक, आयएफएससी कोड यांची माहिती कोणतीही डिजिटल साधने व कॉल सेंटर यांच्या माध्यमातून वा कोणत्याही शाखेमधून मिळविता येईल. देना व विजया या पूर्वाश्रमींच्या बॅंकांनी आपल्या ग्राहकांना दिलेली डेबिट कार्डे यापुढेही कार्डावरील मुदतीच्या काळात चालू राहतील.
एकत्रिकरणाचे काम वेळेत पूर्ण झाल्याच्या संदर्भात ‘बॅंक ऑफ बडोदा’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव चढ्ढा म्हणाले, “कोविड-19च्या साथीची प्रतिकूल परिस्थिती असतानाही, आम्ही देना व विजया या बॅंकांचे बॅंक ऑफ बडोदामध्ये संपूर्ण एकत्रिकरण करण्याचे काम यशस्वीपणे पार पाडले, याबद्दल समाधानी आहोत. आम्ही सर्व ग्राहकांचे पुन्हा मनापासून स्वागत करतो आणि ‘बॅंक ऑफ बडोदा’ची सर्व उत्पादने व डिजिटल सुविधा यांचा लाभ घेण्याची विनंती करतो. एकत्रिकरणाची प्रक्रिया यशस्वी पार पडल्याने, कामकाजातील समन्वयाव्यतिरिक्त, तिन्ही बँकांच्या या विलिनीकणाचे फायदे एकत्रित मिळवून देण्यासाठी आमची बँक सज्ज झाली आहे.”







Leave a Review