The Newz Biz Team, Pimpri-Chinchwad
कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्याने राज्य सरकारने राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा निर्णय घेतानाच कोरोनाची परिस्थिती बघून स्थानिक प्रशासनाने शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यास सांगितले.
पुणे महापालिका हद्दीतील शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंद ठेवणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. तर पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील शाळा 30 नोव्हेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सूत्रांकडून समजते. याबाबतचा आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर काढणार आहेत.
दरम्यान, डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शहर उपनगरांमधील कोरोना रुग्णांची संख्या व शहरातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच शहरातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर माई ढोरे यांनी दिली.
मुंबई महापालिकेने 1 डिसेंबर पर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर शाळा सुरू कराव्यात की बंद ठेवाव्यात याबाबत पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था व गोंधळाची परिस्थिती होती. कोरोना रुग्ण वाढत असल्याने शाळा सुरू न करण्याबाबत सर्वपक्षीय गटनेत्यांनी विनंती केली होती. त्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे महापालिकेने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर व महापालिका आयुक्त काय निर्णय घेणार याकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. गेल्या दोन दिवसांपासून कोरोना बाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला
या संदर्भात बोलताना पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, आगामी काळात शहर आणि उपनगरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. सद्य:स्थितीत महापालिकेतील अधिकारी, शिक्षक, पालकांशी चर्चा करुन आणि कोरोना संसर्ग स्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर माई ढोरे यांनी सांगितले, की डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शहरातील कोरोना रुग्णांची संख्या व शहरातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच शहरातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल. शैक्षणिक संस्थाचालक, शिक्षक, पालकांसोबत चर्चा करूनच निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या शहर परिसरातील कोरोना सद्यस्थिती पाहून हा निर्णय घेण्यात येत आहे, असे महापौर माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले.







Leave a Review