जो बायडेन यांच्या विजयासाठी नाही, पण पॅरिस करारासाठी ‘अंघोळीची गोळी’चा खारीचा वाटा

Share this Newz

The Newz Biz Team, Pune

मदत कितीही छोटी असली, तरी त्यामागील भावना महत्त्वाची असते. महान कार्य छोट्या, सर्वसामान्य माणसांच्या सहकार्याशिवाय तडीस जाऊ शकत नाही. आपल्या अंघोळीची गोळी संस्थेसाठी ‘पॅरिस करार’ हे महान कार्य.

आमची मदत ही “पॅरिस करारासाठी” होती. जो बायडेन साहेब या निवडणुकीत जिंकले, तर अमेरिका पॅरिस करारामध्ये सामील होण्याची शक्यता जास्त होती. बायडेन यांनीही आपण पॅरिस करारात सामील होऊ, असे आश्वासन दिले होते. “वसुधैव कुटुंबकम” ही भारतीय संस्कृती आणि यावरच ‘संयुक्त राष्ट्र संघटना’ काम करते.हे माझं, हे तुझं हा संकुचित भाव इथे नसतो. पण अमेरिकेचे माजी राष्ट्रपती ट्रम्प यांनी सत्तेवर येताच ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन ‘ हा नारा दिला. एवढेच नाही तर त्यांनी ‘पॅरिस करारामधून’ आपले अंग काढून घेतले. असे करून ट्रम्प यांनी आपल्या संकुचित वृत्तीचे दर्शन अवघ्या जगाला घडवले. सीरिया, अफगाणिस्तान अशा अनेक देशात युद्धजन्य परिस्थिती असतानाही हे देश पृथ्वीच्या भल्यासाठी पॅरिस करारामध्ये सामील झाले होते. जगात कार्बन उत्सर्जनात अमेरिकेचा दुसरा क्रमांक लागतो. कार्बन उत्सर्जनामुळे हवामान बदल होतो. या हवामान बदलामुळे तापमान वाढ, अनियमित पाऊस, हवेतील आर्द्रतेचा आणि तापमानाचा अचानक चढ-उतार अशा बाबींची सुरूवात झाली आहे. त्यातून हवामानातही कमालीचे बदल घडत आहेत आणि ही परिस्थिती शेती, कृषी उद्योग आणि इतर उद्योगधंदे यांच्यासाठी अतिशय बाधक ठरणारी आहे.

हवामान बदलामुळे किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या यावर अजून अभ्यास व्हायचा आहे. पण शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे हवामान बदल हे एक प्रमुख कारण आहे, हे सगळेच मान्य करतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार हवामान बदलामुळे येणाऱ्या रोगराईमुळे दरवर्षी अडीच लाख माणसे मृत्युमुखी पडणार आहेत. हवामान बदलामुळे समुद्र पातळी वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे मागील ३० वर्षात पृथ्वीवरील २८ ट्रिलियन टन बर्फ विरघळला आहे. यामुळे २०५० पर्यंत बांगलादेशातील १४ टक्के जनतेला स्थलांतर करावे लागणार आहे. ‘इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज’ संस्थेच्या एका आवाहलानुसार, समुद्राची पातळी ३.६६ मिलीमीटरने दरवर्षी वाढत आहे. १९०० ते १९९० सालापेक्षा आताचा वेग अडीच पट जास्त आहे.

या सर्व गोष्टीमुळेच २०१७ पासून ‘अंघोळीची गोळी’ने त्यावेळेचे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना ट्विटवरून लक्ष करायला सुरवात केली. अंघोळीची गोळी ही संस्था ‘खिळे मुक्त झाडे’, पाणीबचत जागरूकता, हवामान ठोसा आणि अनेक पर्यावरणपूरक उपक्रम राबवत असते. पुढे आम्ही ट्रम्प यांचा एका बॅनर हातात घेऊन त्याचा फोटो काढायला लागलो. तो फोटो आम्ही ट्रम्प यांना टॅग करायला लागलो. तुमच्यासाठी आम्ही एका अंघोळीची गोळी घेतोय, असे अमेरिकेला सांगायला लागलो. अंघोळीची गोळी म्हणजे अंघोळीला दांडी, ठरवून अंघोळ करायची नाही. असे केल्याने पाणी, वीज वाचते आणि पर्यायाने कमी कार्बन उत्सर्जन होते. ट्रम्प यांना तब्बल २५०० ट्विट केले.

अमेरिकेची निवडणूक सुरु असताना ट्रम्प साहेबांनी भारताच्या प्रदूषणावर टीका केली. जो माणूस पॅरिस कराराचा भाग नाही, त्यांना भारताच्या प्रदूषणावर टीका करण्याचा हक्क नाही. आणि मग यातूनच आम्ही एका व्हिडिओद्वारे त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. अमेरिकन माणसांनी मतदान करताना संकुचित वृत्तीच्या माणसाला साथ देऊ नये, हे या व्हिडीओ मार्फत सांगितले. संयुक्त राष्ट्र पॅरिस कराराद्वारे पृथ्वीच्या भल्यासाठी काम करत आहे हे सांगितले.

महात्मा गांधीजी आणि मार्टिन लुथर किंग जुनिअर यांना सीमा नसलेले जग अपेक्षित होते, याचा दाखला देत अमेरिकन मतदारांनी आपले नेते काळजीपूर्वक निवडा, याचे आवाहन संस्थेचे कार्यकर्ते माधव पाटील यांनी केले होते. हा व्हिडीओ अनेक अमेरिकन लोकांना ट्विटरमध्ये टॅग करण्यात आला. हा व्हिडीओ ३०,००० जणांनी पाहिला. हा व्हिडीओ पाहून ३०,००० पैकी जास्त नाही पण किमान ३ अमेरिकन मतदारांनी ट्रम्प यांच्या विरोधात मतदान केले असेल, हा आत्मविश्वास आम्हाला आहे. आणि हाच तो आमचा “खारीचा वाटा”.

बायडेन जिंकले आणि आता पॅरिस करारामध्ये सामील होतील, हा आशेचा किरण आमच्यामध्ये आला. अमेरिका पॅरिस करारामध्ये सामील होईपर्यंत लढत राहू. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ‘हे विश्वची माझे घर’, तुकाराम महाराज यांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे’ या विचारांवर अंघोळीची गोळी संस्था ठाम आहे आणि सतत पर्यावरणासाठी, आपल्या पृथ्वीसाठी काम करत राहू.


Share this Newz