Gold-silver prices fall : सोन्याच्या दरात पुन्हा घसरण

Share this Newz

The Newz Biz Team, मुंबई :

आज दुसर्‍या दिवशीही सोन्या-चांदीच्या दरात (Gold-silver prices fall) घसरण झाली आहे. मंगळवारी दरात घसरण झाली होती. सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली. सोन्याचा दर प्रति तोळा 51 हजार 300 वरून 50 हजार 300 पर्यंत आला. चांदी 62 हजाराहून 61 हजार रुपयांवर प्रति किलो दर झाला आहे. सोन्याच्या दरात प्रतितोळ्यामागे २ दिवसात १६०० रूपयांची घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

अमेरिकन डॉलरमध्ये आलेल्या तेजीमुळे विदेशी बाजारात (Gold Price Down) सोन्याचे दर २ टक्क्यांनी कमी होऊन १८६२ डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. देशांतर्गत बाजारात सोने गेल्या महिन्यातील सर्वोच्च स्तरापेक्षा ६००० रुपये प्रति तोळाने कमी झाले आहे. गेल्या महिन्यात सोन्याचे दर सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. या रेकॉर्ड स्तरावर पोहोचल्यानंतर आतापर्यंत जवळपास ६००० रूपयांनी सोने उतरले आहे.

सलग दोन दिवस सोन्या-चांदीच्या दरात प्रचंड घसरण झाली आहे. हा महिना अधिक मास असून, ग्राहक सोने खरेदी करतात. या कालावधीत प्रथमच सोन्याच्या दरात घसरण होताना दिसून येत आहे. दोन दिवसात सोळाशे रुपये प्रति तोळा सोन्याच्या दरात कमी झाले असल्याचे निदर्शनास येत आहे. सोन्याच्या दरातील घसरण ग्राहकांसाठी आनंदाची वार्ता आहे.

तज्ज्ञांच्या मते देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्या होत्या, जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी आली होती. त्याचप्रमाणे आता या घसरणीनंतर देशात सोन्याच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घटल्यामुळे त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावर झाला आहे. सहा महिन्यापासून सुवर्ण बाजारात अस्थिरता निर्माण झालेली आहे. ही अस्थिरता कायम आहे.


Share this Newz