नवी दिल्ली : पेटीएम अॅप गुगल प्ले स्टोअरवरुन हटवण्यात आले आहे. त्यामुळे गुगल प्ले स्टोअरवरुन पेटीएम डाऊनलोड आणि अपडेट करता येणार नाही. पेटीएमने ट्वीटद्वारे गुगलच्या कारवाईची माहिती दिली. मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यामुळे प्ले स्टोअरवरून पेटीएम अॅपला हटवले असल्याचे गुगलने म्हटले आहे. विशेष म्हणजे Paytm ऍपल स्टोअरवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. पेटीएम बिझनेस, पेटीएम मनी, पेटीएम मॉल आणि अन्य कंपनीच्या मालकीचे इतर ऍप्स अद्याप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत.
गुगलने म्हटले आहे, की आम्ही ऑनलाइन कॅसिनो किंवा कोणत्याही नियमनाविरोधातील जुगार खेळांना समर्थन देत नाही. या ऍपच्या माध्यमातून बाहेरच्या वेबसाइटलाही पैशाच्या माध्यमातून जुगार खेळण्याची परवानगी देण्यात येत होती. तसेच जिंकणाऱ्याला पैसे/रोख बक्षिसे दिली जात असल्याचे गुगलने आपल्या निवेदनात म्हटले आहे. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, Google ने पेटीएमला प्ले स्टोअरवरून हटवण्याची कल्पना डेव्हलपरला दिली होती. प्ले स्टोअरवर अॅप परत मिळविण्यासाठी पेटीएमच्या संपर्कात असल्याचेही गुगलने सांगितले आहे.
पेटीएम हे देशातील सर्वात महत्त्वाच्या स्टार्टअप्सपैकी एक आहे. गुगलचे पेमेंट प्लॅटफॉर्म गूगल-पे सोबत पेटीएमची थेट स्पर्धा आहे. 31 मार्चला संपलेल्या आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये पेटीएमचा रेव्हेन्यू वाढून 3,629 कोटींवर पोहचला होता. पेटीएमची मालकी One97 Communications Limited या भारतीय कंपनीकडे आहे, त्याची स्थापना विजय शेखर शर्मा यांनी केली होती, पण चीनच्या अलिबाबा समूहाशी पेटीएमनं भागीदारी केली होती, त्यामुळे पेटीएमला फिन्टेक कंपनी अँड फायनान्शिएल्सकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळाला होता.
पेटीएमचे इतर अॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध
गुगलने फक्त पेटीएम पेमेंट अॅपला प्ले स्टोअरवरुन हटवले आहे. पेटीएमचे इतर अॅप सध्या प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. यात पेटीएम मॉल, पेटीएम फॉर बिजनेस, पेटीएम मनी, पेटीएम इनस्टोर ऑर्डर्स पेटीएम इनसाइडर आणि पेटीएम स्टोअर मॅनेजर सामील आहेत. तुमचे पेटीएमवर असलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित असून, तुम्ही नेहमीप्रमाणे व्यवहार करू शकता, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.







Leave a Review