“ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा ब्रँड; राज ठाकरेंना साद

Share this Newz

मुंबई : “ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा ब्रँड आहे. दुसरा महत्त्वाचा ब्रँड पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रँडनाच नष्ट करायचे आणि त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरेही ठाकरे या ब्रँडचेच घटक आहेत. या सगळ्याचा फटका त्यांनाही भविष्यात बसणार आहे. शिवसेनेसोबत त्यांचे मतभेद असू शकतात. पण शेवटी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल,” असे मांडत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना साद घातली आहे. खासदार  राऊत यांनी सामनाच्या ‘रोखठोक’ या सदरात ‘मुंबईचे खच्चीकरण कोणासाठी ! जगाची नाही, मुंबई महाराष्ट्राच्या बापाची !!’ हा लेख लिहिला आहे.

अभिनेत्री कंगना रणौतने काही दिवसांपूर्वी मुंबई ही आपल्याला पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते आहे असे वक्तव्य केले होते. त्यावरुन बराच वादंग माजले आहे. सिनेसृष्टीतल्या अनेक कलाकारांनी कंगनाच्या या वक्तव्याचा निषेध केला. एवढेच नाही तर राजकीय वर्तुळातही कंगनावर टीका झाली. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात कंगनाविरोधात हक्कभंगही आणला गेला.

खासदार राऊत यांनी रोखठोक म्हटले आहे, की मुंबईस पाकिस्तान व महापालिकेस बाबराची सेना असे बोलणाऱ्य़ांच्या मागे महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष उभा राहतो हे विचित्र आहे. पण सुशांत आणि कंगनास पाठिंबा देऊन त्यांना बिहारच्या निवडणुका जिंकायच्या आहेत. बिहारातील उच्चवर्णीय रजपूत, क्षत्रिय मते मिळविण्यासाठी हा खटाटोप आहे. त्यासाठी महाराष्ट्राचा अवमान झाला तरी चालेल. हे धोरण ‘राष्ट्रीय’ म्हणवून घेणाऱ्य़ांना शोभणारे नाही. महाराष्ट्राचा अवमान केला, म्हणून दिल्लीतील एकाही मराठी केंद्रीय मंत्र्यास वाईट वाटले नाही तेथे संतापून राजीनामा वगैरे देण्याची बातच सोडा. ‘ठाकरे’ हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅण्ड आहे. दुसरा महत्त्वाचा ‘ब्रॅण्ड’ पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रॅण्डनाच नष्ट करायचे व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे.

जेव्हा अभिमन्यू एकटा लढत होता, तेव्हा तुझा धर्म कुठे गेला होता कर्णा?” संदीप देशपांडे

मी जे मांडतो आहे ती पक्षाची अधिकृत भूमिका नाही. पक्षाची अधिकृत भूमिका राज ठाकरे मांडतील. मला वैयक्तिक रित्या असं वाटतं की २००८ पासून जेव्हा महाराष्ट्रातील मराठी मुलांना नोकऱ्या मिळाव्यात म्हणून मनसेचे प्रयत्न सुरु होते… तेव्हा शिवसेनेचे दिल्लीतले खासदार मूग गिळून गप्प होते. ज्यावेळी पाकिस्तानी कलाकारांना महाराष्ट्राच्या बाहेर हाकला अशी भूमिका पक्षाने आणि राज ठाकरेंनी घेतली तेव्हा शिवसेनेचे नेते गप्प होते. २०१४ आणि २०१७ च्या निवडणुकीच्या वेळी जेव्हा राज ठाकरेंनी शिवसेनेला साद घातली तेव्हा शिवसेनेने आमच्यासोबत दगाफटका केला. रातोरात आमचे नगरसेवक पळवले. त्यामुळे जो प्रश्न कृष्णाने कर्णाला केला तोच प्रश्न आज मला विचारावासा वाटतो, जेव्हा अभिमन्यू एकटा लढत होता तेव्हा तुझा धर्म कुठे गेला होता कर्णा?” अशा शब्दात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राऊत यांच्या आवाहनाला टोला लगावला आहे.


Share this Newz