तरूणांना खुणावणारे ‘दृष्टी पलीकडील’ डिझाईन क्षेत्र’

-प्रकाश जमाले, संपादक : साप्ताहिक क्रांतीप्रकाश
Share this Newz

डिझाइनिंग ही एक कला, शास्त्र व ज्ञान आहे. एवढेच नव्हे तर तो यज्ञ आहे. डिझाईनिंग हे मानवी जीवनाशी निगडीत एक उभरते आधुनिक क्षेत्र आहे, जे आजच्या तरुणांना खुणावत आहे. ‘डिझाईन’ने जणू संपूर्ण मानवी जीवनच व्यापले आहे आणि म्हणून यापुढे ‘डिझाईन थिंकिंग’ ला सोन्याचे दिवस येतील ! काय आहे हे ‘डिझाईन थिंकींग’? त्याचा मानवी जीवनाशी संबंध काय? हे सर्वांनाच कळेल असे नाही, यासाठी हवी आहे एक वेगळी ‘नजर’ ! ती ‘नजर’, ती ‘दृष्टी’ काही जणांकडे उपजत असते, तर काहीजण प्रयत्नाने, अभ्यासाने अथवा परिश्रमाने स्वतःमध्ये विकसित करतात. अशा लोकांसाठी ‘डिझाईन थिंकींग’ ही संस्था एक ‘बूस्टर डोस’ ठरू शकेल !

‘डिझाइन’ बाबत ज्यांना जिज्ञासा आहे किंवा ‘डिझाइन’मध्ये ज्यांना जिज्ञासा जागृत करायची असेल, काहींना ‘डिझाईन’ मध्ये करिअर करायचे असेल, अथवा उगवत्या कलाकारांच्या मदतीसाठी राज्यातील काही सुशिक्षित होतकरू व ‘डिझाईन’ क्षेत्राशी संबंधित तरुणांच्या संकल्पनेतून ‘think 4r design’ या व्यासपीठाची निर्मिती होत आहे. दैनंदिन जीवनात, बोटा एवढ्या वस्तूपासून ते इमारती एवढ्या वास्तूपर्यंत, ‘डिझाईन’चे क्षेत्र व्यापलेले आहे. आपल्या रोजच्या जीवनातील प्रत्येक वस्तूमध्ये आकार, रचना आणि रूपरंगात दिवसेंदिवस नाविण्यता आलेली आपणास पहायला मिळते. यातून आपणास ‘डिझाईन’ थिंकिंग ची व्याप्ती समजेल. म्हणूनच ‘डिझाईन’ बद्दल जाणीव व जागृती करण्यासाठी ‘थिंक फोर डिझाईन’ या संस्थेची उभारणी करण्यात येत आहे.

ही संस्था मुलांच्या शालेय जीवनापासूनच त्यांचा कल अभ्यासून त्यांच्या कृतींची मूलभूत बांधणी होण्यासाठी व त्यापुढेही डिझाईनच नव्हे; तर विविध क्षेत्रासंबंधी नोकरी अथवा व्यवसायासाठी मोलाची कामगिरी बजावेल. यासाठी ही संस्था आवश्यक ते नाविन्यपूर्ण व सृजनशील उपक्रम राबविण्यासाठी गावागावांत, शहराशहरांत छोट्या-मोठ्या संघटनांचे जाळेही उभारील. खऱ्या अर्थाने सर्वांसाठीच ही संस्था जणू ‘दीपस्तंभ’ बनून राहील !
शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक विषय ‘रचनावादातून’ विद्यार्थी शिकू लागले आहेत. या रचनावादामध्येही ‘डिझाईन’ मार्फत मोलाची कामगिरी होऊ शकेल. आपणास अनेक ठिकाणी पुस्तकाचे गाव, गणिताचे गाव ,कवितेचे गाव अशा संकल्पना पहावयास मिळतात या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी ‘डिझाईन’ला पर्याय नाही. यामुळेच तर मुलांमध्ये अभ्यासाची तसेच मोठ्यांमध्ये वाचनाची गोडी खऱ्या अर्थाने निर्माण व्हायला मदत होत आहे.

‘गणिताचे गाव’, गणित विषयासंदर्भात ‘गणिताचे गाव’, हा उपक्रम आपण राबविलेला आहे, की ज्यामुळे संपूर्ण परिसर उजळून निघालाच आणि त्या बरोबर गणितासारखा अवघड वाटणारा विषय सुलभ होऊन मुलांना अभ्यासाची गोडीही निर्माण होत आहे. असे उपक्रम इथून पुढे या संस्थेच्या माध्यमातून राबविणार आहे, असे मत संस्थेचे संचालक उमेश पवार यांनी व्यक्त केले.

शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या ग्रामस्वच्छता अभियान, स्वच्छ भारत अभियान, तंटामुक्त ग्राम, पोलिओ निर्मूलन, सुकन्या योजना किंवा सध्या चालू असणाऱ्या कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या जागृतीसाठी, विविध सामाजिक व राष्ट्रीय अभियान करीता ‘डिझाईन’ मार्फत मोठी चळवळ उभारली जाऊ शकेल !
आपण आपल्या अवतीभोवती अनेक कलाकार पाहतो. परंतु संधी, योग्य मार्गदर्शन अथवा कौतुकाची थाप न मिळाल्याने, त्यांची कला तेथेच खंडीत होते. अशा कलावंतांना पाठबळ व स्थैर्य देण्याचे काम ही संस्था करील. डिझाईन विषयाच्या अनेक असंघटित कलाकारांना संघटित करून, त्यांच्या कलेला पैलू पाडण्यासाठी आवश्यक त्या तज्ज्ञांनी ‘डिझाईन’ क्षेत्रातील अनेक यशस्वी तरुण एकत्रित येऊन ‘डिझाईन’ संस्कृतीचा देशहितासाठी उपयोग करण्याकरता ‘थिंक फॉर डिझाईन’ या संस्थेची निर्मिती करीत आहेत. या संस्थेचा ‘वेलू गगणावरी’ नेण्याकरिता आपल्या मार्गदर्शन व सहकार्याचे सिंचन लागणारच !

संस्थेसंबधी अधिक सविस्तर माहितीसाठी www.think4rdesign.com ही वेबसाईट कृपया पहावी.

‘डिझाईन’ क्षेत्रातील ‘तज्ज्ञ’ महेश चौकेकर, रवी तोडकर, अभिजीत राऊत, विक्रम कवडे, संतोष थोरात, विशाल रुब्दी आणि उमेश पवार इ. डिझाईन प्रेमींच्या कल्पनेतून व श्रमातून ही संस्था नावारूपास येत आहे.

LEARN, EARN & RETURN !
असा साधा, सरळ दृष्टिकोन बाळगणारे या संस्थेचे संचालक,हे डिजाईन व विविध क्षेत्रात यशस्वी आहेत. समाज व देशाने खूप काही दिले. आता आपल्या बांधवांसाठी आपनाकडूही काही कर्तव्यपूर्ती व्हावी, याचसाठी हा ‘संस्था’ प्रपंच !

“एकाकी जन दुर्लक्षित जन,
आप्त एकमेकांचे व्हावे!
संघटना हे सूत्र बनावे!
आणि ‘देशहित’ साधावे !”
…… हे ‘स्वप्न’ संस्था चालकांचे आहे आणि ते सत्यात येईलच,असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष महेशजी चौकेकर यांनी व्यक्त केला.

‘Think 4 Design’ संस्थेकरिता करिता प्रेमपुर्वक शुभेच्छा !

 

Advertisement

Share this Newz