अकरावी प्रवेशाची गुरुवारी जाहीर होणारी दुसऱ्या फेरीची निवड यादी पुढे ढकलली

Share this Newz

पुणे :  मराठा आरक्षण स्थगितीचा परिणाम अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेवर झाला असून, गुरुवारी जाहीर केली जाणारी दुसऱ्या फेरीची निवड यादी पुढे ढकलण्याचा निर्णय शिक्षण विभागातर्फे घेण्यात आला आहे. दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी 75 हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरला आहे.

पालक आणि विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे महाविद्यालय मिळेल की नाही, याची चिंता लागलेली असताना दुसऱ्या फेरीच्या गुणवत्ता यादीकडे त्यांचे लक्ष लागले होते. मात्र, आता पुढे ढकलण्यात आल्याने आणखी चिंतेत भर पडणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्यानंतर शिक्षण विभागातील अधिकारी आणि इयत्ता 11वी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी चर्चा केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात नेमके काय नमूद केले आहे, त्याचा अभ्यास करून शासन पुढील आदेश देईल, तो पर्यंत ही प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी सांगितले.


Share this Newz