Final year exam : अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात

Share this Newz

मुंबई : राज्यातील विद्यापीठ स्तरावरील अंतिम सत्राच्या लेेखी परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होतील आणि या परीक्षेचा निकाल महिना अखेर पर्यंत लावण्याचा प्रयत्न असणार आहे, यावर अखेर आज शिक्कामोर्तब झाले. विद्यार्थ्यांनी घरी बसून परीक्षा देण्यास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिली आहे. याबाबत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली.

राज्यपाल आणि कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सामंत यांनी ही माहिती दिली. उद्या (शुक्रवारी) दुपारी १२ वाजता अंतिम अहवाल सादर केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

घरात बसून परीक्षा झाली पाहिजे, यासाठी आमचा आग्रह होता. त्याला राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. परीक्षा घेण्यासंबंधी ऑनलाइन, ऑफलाइन असे चार प्रकार असून, त्यासंबंधी अंतिम अहवाल आज रात्रीपर्यंत तयार होईल. उद्या शासनाला तो प्राप्त होईल. अहवाल मिळाल्यांतर कोणतीही मुदत न घेता तातडीने विद्यापीठांकडे पाठवू, असे उदय सामंत यांनी सांगितले.

सोमवारी किंवा मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक बोलावून युजीसीला विनंती करण्याबाबत निर्णय घेऊ. ३१ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातील सर्व निकाल लावू शकतो ही जी कुलगुरुंनी भूमिका घेतली आहे ती आम्ही युजीसीकडे मांडणार आहोत.

१५ ते ३० सप्टेंबर दरम्यान प्रॅक्टिकल परीक्षा घेण्याचा प्रयत्न असणार आहे. प्रॅक्टिकल परीक्षा सोप्या पद्धतीने घेतल्या जातील. यासंबंधी कुलगुरु निर्णय घेत आहेत. प्रॅक्टिकल परीक्षादेखील विद्यार्थ्यांना केंद्रावर न येता देता यावी यासाठी प्रयत्न असून, तसाच अहवाल तयार करण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यात परीक्षा घेऊन ३१ ऑक्टोबरपर्यंत निकाल द्यावा, अशा पद्धतीच्या सूचना कुलगुरुंना केल्या असून, राज्यपालांनीही त्याच सूचना केल्या आहेत. परीक्षेच्या तारखा संबंधित विद्यापीठं अंतिम करणार आहेत.


Share this Newz