Pranab mukherjee : क्लर्क म्हणून करिअरची सुरुवात केलेल्या प्रणवदांचा जाणून घ्या प्रवास

Share this Newz

प्रणव मुखर्जी यांचा जीवनप्रवास

क्लार्क, पत्रकार, प्राध्यापक म्हणून काम

प्रणव यांचा जन्म ब्रिटिश काळातील बंगाल प्रेसिडेंसी म्हणजे आताच्या पश्चिम बंगालच्या मिराती गावात 11 डिसेंबर 1935 ला झाला होता. त्यांनी कलकत्ता विश्वविद्यालयातून पॉलिटिकल सायन्स आणि इतिहास विषय घेऊन M.A. केले. त्यांनी डेप्यूटी अकाउंट जनरल (पोस्ट अँड टेलीग्राफ) मध्ये क्लर्क म्हणून काम केले होते. 1963 मध्ये त्यांनी कोलकाताच्या विद्यानगर कॉलेजमध्ये राज्यशास्त्राचे लेक्चरर म्हणून काम केले होते. त्यांनी पत्रकार म्हणूनही काही काळ काम केले. त्यानंतर सन १९६९ मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर राज्यसभेचे सदस्य बनले आणि येथूनच त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली.

1969 मध्ये सुरू झाला राजकीय प्रवास

प्रणव यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात 1969 मध्ये झाली. त्यांनी मिदनापूर पोटनिवडणुकीत वीके कृष्ण मेनन यांचे कॅम्पेन सांभाळले होते. थोड्याच काळात ते इंदिरा गांधी यांचे चाहते बनले. १९७३ मध्ये ते इंदिरा गांधी यांच्या कार्यकालात औद्योगिक विकास मंत्रालयाचे उपमंत्री बनले. त्यानंतर 1975, 1981, 1993 आणि 1999 मध्येही राज्यसभेवर निवडून गेले.

राजीव गांधींशी न पटल्याने राष्ट्रीय समाजवादी काँग्रेसची स्थापना

राजीव गांधी यांच्याशी मात्र त्यांचे संबंध तितकेसे चांगले नव्हते. राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते. राजीव गांधी यांच्याशी त्यांचे न पटल्याने त्यांनी राष्ट्रीय समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. मात्र, पुढे ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले. इंदिरा गांधी यांच्यानंतर आपण पंतप्रधान बनावे हे प्रणवदांचे स्वप्न होते. मात्र, इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी पंतप्रधान बनले.

पी. व्ही. नरसिंह राव यांचे मोठे सहकार्य

पी.व्ही. नरसिंहराव यांनी प्रणवदांना मोठे सहकार्य केले. नरसिंह राव पंतप्रधान बनल्यानंतर त्यांनी प्रणवदांकडे योजना आयोगाचे अध्यक्षपद सोपवले. त्यानंतर त्यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली.

सोनियांना काँग्रेस अध्यक्षा बनवण्यात प्रणवजींचा हात

सोनिया गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्यात प्रणव मुखर्जी यांचे मोठे योगदान मानले जाते. राजकारणातील सर्व डावपेच त्यांनीच सोनिया गांधीना सांगितल्याचे म्हटले जाते. प्रणवदांच्या सल्ल्याशिवाय सोनिया गांधी कोणताही निर्णय घेत नसत असेही म्हटले जाते.

मनमोहन सिंह सरकारमध्ये प्रणवदा दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री

सन २००४ मध्ये प्रणवदा जंगीपूर येथून लोकसभा निवडणूक जिंकले. त्याचवेळी केंद्रात काँग्रेसप्रणित यूपीएचे सरकार स्थापन झाले. मात्र, यावेळी त्यांच्या ऐवजी डॉ. मनमोहन सिंह यांना पंतप्रधान बनवण्यात आले. डॉ. सिंह यांच्यानंतर त्यावेळी प्रणव मुखर्जी हे काँग्रेसचे दुसरे मोठे नेते होते. डॉ. सिंह यांच्या ऐवजी ते पंतप्रधान बनले असते, तर विकासात देश आणखी पुढे असता असेही बोलले जाते.

पी. ए. संगमा यांचा पराभव करत भरघोस मतांनी राष्ट्रपतीपदी

जुलै २०१२ मध्ये पी. ए. संगमा यांचा पराभव करत ७० टक्के इतक्या भरघोस मतांनी ते राष्ट्रपतीपदी विराजमान झाले. हे देशाचे १३ वे राष्ट्रपती होते. २०१२ ते २०१७ या काळात देशाचे राष्ट्रपतीपद सांभाळले होते. तत्पूर्वी त्यांनी केंद्र सरकारमध्ये वित्त, संरक्षण, परराष्ट्र यासह विविध महत्त्वपूर्ण पदांवर काम केले होते. तसेच लोकसभा आणि राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले होते. त्याबरोबरच विविध संसदीय समित्यांमध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली होती.

प्रणवदांची कौटुंबिक पार्श्वभूमी :

प्रणव मुखर्जींचा जन्म बंगालमधील वीरभूम जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक कामदा किंकर मुखर्जी आणि राजलक्ष्मी मुखर्जी यांच्या घरी झाला होता. त्यांना बालपणापासूनच राजकारणाचे धडे मिळाले होते.


Share this Newz