लोकांनी नोटा केल्या सॅनिटाईज, धुतल्या, वाळवल्या; खराब नोटांचे आकडे पहा

Share this Newz

नवी दिल्ली : कोरोना काळात मोठ्या प्रमाणात लोकांनी नोटांना सॅनिटाईझ केले, त्या धुतल्या आणि उन्हात वाळत घातल्या. यामुळे 2000 रुपयांच्या तब्बल 17 कोटी नोटा खराब झाल्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेकडे (आरबीआय) येणाऱ्या खराब नोटांच्या या आकड्याने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.

आरबीआयच्या अहवालात म्हटले आहे की, यावर्षी दोन हजारांच्या १७ कोटी रुपयांच्या नोटा खराब झाल्या आहेत. ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत ३०० पट जास्त आहेत. दुसऱ्या स्थानी २०० रुपयांच्या नोटांचा क्रमांक लागतो, तर तिसऱ्या स्थानी ५०० रुपयांच्या नोटांचा क्रमांक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सर्व नोटा खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. चलनामुळे संसर्ग होण्याची लोकांना भीती वाटत आहे, असे अहवालात म्हटले आहे. तसेच लोकांनी चलन सॅनिटाइझ करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला लोकांनी नोटा धुतल्या. त्यानंतर अनेक तास नोटा उन्हात वाळत घातल्या. बँकांमधूनही नोटावर सॅनिटायझर स्प्रे करण्यात येत होते. परिणामी जुन्या तर खराब झाल्याच, पण नव्या नोटाही वर्षभरात खराब झाल्या.

आरबीआयने जारी केलेल्या अहवालात स्पष्ट होते की, दहा रुपयांपासून दोन हजारांपर्यंतच्या नोटा प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने खराब झाल्या आहेत. दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद झाली आहे. गेल्या वर्षी दोन हजारांच्या ६ लाख नोटा आरबीआयकडे बदलण्यास आल्या. यावर्षी ही संख्या १७ कोटींपेक्षाही जास्त आहे.

नागरिकांची रुपयाच्या नाण्याकडे पाठ

आरबीआयने दिलेल्या अहवालानुसार गेल्या वर्षी एक रुपयाच्या दोनशे कोटी रुपयांच्या नाण्यांची मागणी होती. या वर्षी त्यात घट होऊन फक्त १२ कोटी रुपयांची मागणी आली. म्हणजे ९५ टक्के लोकांनी एक रुपयाची नाणी स्वीकारणे बंद केले. दहा रुपयाच्या नाण्यांनाही कंटाळले. गेल्या वर्षी दहा रुपयांची २०० कोटी रुपयांच्या नाण्यांची मागणी होती. परंतु यावर्षी केवळ १२० कोटी रुपयांच्या नाण्यांची मागणी होती.


Share this Newz