पुणे :
सुशिक्षित बेरोजगार तरुण आणि बचत गटातील महिलांना सोयिस्कर मालवाहतूक, तसेच एमआयडीसी अंतर्गत वाहतुकीला पर्याय म्हणून फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन आणि भोर कायनेटिक ग्रीन मार्फत चालते फिरते दुकान निर्माण करून देण्यात येणार आहे.
याबाबत माहिती देताना फोरमचे अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले, की याद्वारे बचत गटातील महिलांना आपल्या वस्तू विक्री करता येतील. तसेच साड्या, ड्रेस मटेरियल, भाजी विक्रीही करता येणार आहे. त्यामुळे अनेक हातांना काम उपलब्ध होऊन रोजगाराची निर्मिती होईल. उद्योजकांना माल वाहतुकीसाठी आणि प्रवासी वाहतुकीसाठी इलेक्ट्रिकल टेम्पो आणि रिक्षा पिंपरी, चिंचवड, चाकण, ठाणे, नेरुळ, रांजणगाव, तळेगाव या परिसरात ही योजना सुरू करण्यात येणार आहे. उद्योजकांना आपला माल जवळपासच्या औद्योगिक परिसरात पाठवावा लागतो, परंतु थोड्या अंतरासाठी रिक्षा किंवा टेम्पोसाठी मोठे भाडे आकारले जाते. अनेक उद्योजकांना दिवसभरात चार ते पाच वेळा मालाची वाहतूक करावी लागते, त्यांच्या खर्चामध्ये यामुळे मोठी बचत होणार आहे.
सध्याच्या परिस्थितीमध्ये उद्योजकांना मालाच्या वाहतुकीसाठी खर्च परवडत नाही. त्यावर पर्याय म्हणून उद्योजकांना सरकारी योजने मार्फत फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन इलेक्ट्रिकल टेम्पो देणार असून, सुशिक्षित आणि बेरोजगार तरुण आणि महिलांसाठी एमआयडीसी परिसरात अंतर्गत वाहतूक करण्यासाठी कर्ज सुविधा, इलेक्ट्रिकल रिक्षा आणि संपूर्ण सहाय्य करण्यात येणार आहे. त्यामुळे तरुण वर्गाला नवीन स्टार्टअप उद्योग व्यवसाय मिळणार आहे. या मार्फत छोटे मोठे व्यवसाय सुद्धा निर्माण करण्यास संपूर्ण सहाय्य केले जाईल, असे अभय भोर यांनी सांगितले.
ही वाहने पूर्णपणे इलेक्ट्रिक असून, दोन तास चार्जिंगमध्ये पन्नास ते साठ किलोमीटर अंतर पार करू शकतात. महिला वर्गाला अल्प दरामध्ये या गाड्यांचे प्रशिक्षण दिले जाणार असून, कर्ज सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे, असेही भोर म्हणाले.









Leave a Review