द न्यूज बिज् टाईम्स, पुणे : महाराष्ट्रातील १३ कोटी मराठीजणांसाठी आनंदाची बातमी आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठीची मागणी केंद्र सरकारने मान्य करीत सुखद धक्का दिला आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळविणारी मराठी ही सातवी भाषा आहे. यापूर्वी देशातील तामिळ, तेलुगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि उडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.
केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याने मोठा फायदा होणार आहे. मराठी भाषेत जे विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या दोघांना राष्ट्रीय पुरस्कार मिळणार आहे. अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येते, ते मराठीसाठीही स्थापन करण्यात येईल.
२०१२ साली प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली. या समितीने २०१३ साली आपला अहवाल प्रकाशित केला. महारट्ठी-महरट्ठी-मऱ्हाटी-मराठी असा मराठीचा उच्चार बदलत गेला, असे या अहवालात म्हटले आहे. महाराष्ट्री भाषा ही महाराष्ट्र हा प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित होती आणि मराठीचे वय किमान अडीच हजार वर्ष जुने असल्याचे पुरावे असल्याचे या अहवालात सांगितले होते.
आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने भारतातील प्रत्येक विद्यापीठात मराठी भाषा अध्यासन असणार आहे. भारतातील सर्व ४५० विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवली जाईल. याबरोबरच मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी या सर्वाना भरीव स्वरूपात मदत मिळणार आहे.







Leave a Review