कर्मवीर भाऊराव पाटील साहित्य संमेलनात डॉ. लक्ष्मण कार्ले यांचा होणार सन्मान  

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, तळेगाव दाभाडे : कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, नांदेड यांच्यातर्फे तळेगाव दाभाडे येथील डॉ. लक्ष्मण कार्ले यांना आरोग्य सेवा क्षेत्रात बजावलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे.

येत्या 29 मार्च रोजी पहिले राज्यस्तरीय कर्मवीर भाऊराव पाटील साहित्य संमेलन उमरगा येथे आयोजित करण्यात आले असून, या संमेलनात डॉ. कार्ले यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजक कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ नांदेडचे संस्थापक अध्यक्ष ऍड. बी. आर. कलवले यांनी दिली. या साहित्य संमेलनात शिक्षण, समाज व साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
डॉ. लक्ष्मण कार्ले हे गरीब, गरजू रुग्णांना मोफत औषधोपचार सेवा देण्याचे कार्य करीत आहेत. कोरोना काळात भीतीच्या सावटाखाली असलेल्या गरीब, गरजू रुग्णांच्या घरी जाऊन औषधोपचार देण्याचे कामही त्यांनी केले आहे. वयाच्या पंचाहत्तरीत त्यांनी केवळ रुग्णसेवा करण्याच्या उद्देशाने खालुंब्रे येथे श्रद्धा हेल्थकेअर दवाखाना सुरू केला, असून त्या माध्यमातून रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजून कार्य सुरू आहे.
दरम्यान, 1993 मध्ये झालेल्या किल्लारी भूकंपानंतर उत्कृष्ट काम केल्याबद्दल, तसेच स्वयंसेवी रक्तदात्यांकडून रक्तदान करून घेऊन 5 लाखापेक्षा अधिक बॅग रक्त संकलन व वेगवेगळ्या रक्तपेढीला वितरण केले. सामाजिक बांधिलकीतून मागील 20 वर्षांपासून मोफत सर्वरोग निदान, औषधोपचार व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करत असतात. आदी कार्याची दखल घेऊन डॉ. कार्ले यांचा गौरव करण्यात येणार आहे.

 


Share this Newz