द न्यूज बिझ टाईम्स, पुणे : तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील जनरल मोटर्स कंपनी ह्युंदाई कंपनीने विकत घेतल्याने स्थानिकांच्या हाताला काम मिळून त्यांचे भविष्य उज्ज्वल होणार आहे. त्यामुळे नवलाख उंब्रे, आंबी, मंगरूळ, जाधववाडी, बधलवाडी, वारंगवाडी, तळेगाव दाभाडे आदी परिसरातील तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, या गावकऱ्यांनी ह्युंदाई कंपनीचे फटाक्यांची आतिषबाजी करीत एकमेकांना पेढे भरवून कंपनीचे स्वागत केले.
ह्युंदाई कंपनीच्या प्रवेशद्वारावर ग्रामस्थ, तरुण, महिला यांनी एकत्र जमून गुलाबपुष्प व पेढे भरवून फटाक्यांची आतिषबाजी करीत ह्युंदाई कंपनीचे स्वागत केले. यावेळी रणजीत काकडे, सरपंच रामनाथ बधाले, ह.भ.प. दिनकर शेटे, तानाजी पडवळ, ग्रामपंचायत सदस्य संतोष नरवडे, नवनाथ पडवळ, संग्राम कदम, राजू कडलक, नागेश शिर्के, गुरुदेव घोलप, सतीश कदम, दत्तात्रय कदम, गोरख शेटे, तसेच गावकरी पुरुष, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावकऱ्यांनी भावना व्यक्त करताना सांगितले, की जनरल मोटर्सचा जवळपास 300 एकराचा प्लांट ह्युंदाई कंपनीने विकत घेतल्याने स्थानिक हजारो हातांना काम मिळण्यास मदत होणार आहे. हा प्लांट बंद केल्याने तब्बल दोन हजाराहून अधिक तरुणांचे काम गेले आहे. आता ह्युंदाई कंपनीच्या माध्यमातून 3 ते 4 हजार तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. तसेच या कंपनीच्या माध्यमातून लघु उद्योगांनाही मोठा फायदा होणार आहे.
सरपंच रामनाथ बधाले यांनी सांगितले, की गेल्या काही वर्षात तळेगाव आणि त्याच्या आसपासचा वाढता औद्योगिक पसारा पाहता रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होताना दिसत आहेत. याआधीच तळेगावपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या चाकणमध्ये औद्योगिक विकास झाल्यामुळे देशभरातला तरुणवर्ग रोजगारासाठी तिथे येत आहे. याशिवाय जेसीबी, जीएम, ऑडी, फोक्सवॅगन यासारख्या नावाजलेल्या ऑटोमोबाइल कंपन्यांनी त्यांची युनिट्स तिथे उभारली असून, इथून पुढे तळेगावमध्ये विस्तार करण्याच्या त्यांच्या योजना आहेत. आजघडीला तळेगाव स्थित औद्योगिक क्षेत्रात तब्बल 25 हुन अधिक बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. या माध्यमातून 15 हजार लोकांना रोजगारप्राप्ती झाली आहे.
रणजीत काकडे म्हणाले, की तळेगाव भागासाठी सरकारी धोरणे, मुंबई-पुणे महामार्ग, लोह असलेली जवळीक, मुंबई आणि पुण्याची कनेक्टिव्हिटी या सर्व गोष्टी तळेगावात बहुराष्ट्रीय कंपन्या यायला आकर्षण ठरत आहेत. सह्याद्रीच्या रांगांनी वेढलेले आणि हिरवाईमध्ये हरवलेले असे हे तळेगाव परिसर आहे. पुणे आणि मुंबई या महत्त्वाच्या शहरांना तळेगाव चांगल्यारीतीने जोडलेले आहे.त्यामुळे ह्युंदाई सारख्या मोठ्या उद्योगांना आपला विस्तार करण्यास मोठा वाव आहे.
Leave a Review