द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी : दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचा शहराच्या विकासात मोठा वाटा असून, त्यांच्या कार्याची स्मृती उभारण्यात यावी. पिंपरी-चिंचवड महापालिकेची नवीन इमारत उभारण्यात येणार असून, त्यासमोर आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी माजी नगरसेवक जयंत ऊर्फ आप्पा बागल यांनी महापालिका आयुक्त व प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात माजी नगरसेवक आप्पा बागल यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पिंपरी-चिंचवड शहराची निर्मिती भोसरी, पिंपरी, चिंचवड, निगडी, आकुर्डी या ग्रामपंचायतींच्या एकत्रीकरणातून झाली. त्यावेळी शहराची ७८ हजार असणारी लोकसंख्या आजमितीस ३० लाखांच्या उंबरठ्यावर आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, स्वर्गीय अण्णासाहेब मगर, स्वर्गीय वसंतदादा पाटील, स्वर्गीय डॉ. श्री. श्री. घारे, स्वर्गीय प्रा. रामकृष्ण मोरे, स्वर्गीय मधुकर पवळे, स्वर्गीय अंकुशराव लांडगे, स्वर्गीय नानासाहेब शितोळे या प्रभृतींनी या शहराचे जडणघडणीत सिंहाचा वाटा उचललेला आहे.
शरदराव पवार, अनंतराव थोपटे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी शहराचे पालकत्व सांभाळले. या सर्वांच्यामध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे पिंपरी-चिंचवडच्याच मातीतील नेतृत्व होते. १९८६ मध्ये अगदी वयाच्या २१ व्या वर्षी लोकप्रतिनिधी म्हणून महापालिकेच्या सभागृहात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी पुढील २१ वर्षे महापालिकेतील विविध पदांची जबाबदारी पेलून अनेक योजना, प्रकल्प, नागरी सुविधांचा दर्जा वाढवण्यासाठी काम केले, दूरदृष्टी ठेवून शहराच्या विकासाचा आलेख वाढविला.
पुढे विधानपरिषद विधानसभा यांचेही ते सभासद झाले. आपल्या नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, आमदार या पदांना खऱ्या अर्थाने त्यांनी न्याय दिला. त्या पदांची उंची वाढवून विविध योजना प्रकल्प कार्यान्वित केले. लक्ष्मण जगताप हे महापालिकेचे महापौर होते. तसेच शेवटच्या श्वासापर्यंत ते आमदार होते. त्यांनी शहरासाठी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहणारे आहे. भविष्यातील नव्या सदस्यांना ते दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरणारे आहेत. त्यामुळे नव्याने होणाऱ्या महापालिका भवनासमोर दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचा भव्य पुतळा उभारावा, महापालिकेच्या सभागृहात त्यांचे तैलचित्र लावावे, त्यांच्या नावाने पुण्यातील ब्रिटिश लायब्ररीसारखी अद्ययावत हजारो पुस्तकांची लायब्ररी उभारावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Leave a Review