कृष्णा चौकातील संथगतीच्या कामामुळे वाहतूक कोंडी बनलीय नित्याचीच

महापालिका आयुक्तांनी लक्ष घालण्याची राजेंद्र जगताप यांची मागणी
Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी :    जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे नवी सांगवीतील कृष्णा चौकात निर्माण झालेल्या भयानक परिस्थितीनंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने पावसाळी गटाराचे काम हाती घेतले. मात्र, संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे नागरिक, तसेच वाहनचालक वैतागले आहेत. नागरिकांची गैरसोय लक्षात घेता इथले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. 

महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत सिमेंट काँक्रीटचे रस्ते उभारले खरे; पण याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे कृष्णा चौकाला अक्षरशः नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. हे पाणी थेट रहिवाश्यांच्या घरात घुसल्याने भर पावसात रहिवाश्यांना रस्त्यावर येण्याची वेळ आली. मुळात पावसाळी गटारांची कामे पावसाळ्यापूर्वी होणे अपेक्षित असते. पण तत्कालीन भाजपचे नगरसेवक, महापालिका अधिकारी व ठेकेदार यांच्या अनास्थेमुळे पावसाळी गटाराची कामे केली गेली नाहीत. आता मात्र भर पावसाळ्यात या चौकातील पावसाळी गटाराचे काम हाती घेतले आहे. याचा फटका वाहचालक व पादचाऱ्यांना बसत आहे. दररोज सकाळी कामावर जाण्याच्या वेळी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

नवी सांगवी व पिंपळे गुरव परिसरातील कृष्णा चौक हे मध्यवर्ती ठिकाण आहे. या चौकाच्या परिसरात अनेक हॉटेल्स, हॉस्पिटल्स, कापड दुकाने, भाजी मंडई, शालेय साहित्याची दुकाने, स्टेशनरी दुकाने आहेत. तसेच पिंपळे गुरवकडून पुणे शहर, हिंजवडी आयटी पार्ककडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळी या रस्त्यावर मोठी रहदारी असते. आता याच रस्त्यावरील कृष्णा चौकात  पावसाळी गटाराचे काम सुरु केले आहे. मात्र, अतिशय संथ गतीने हे काम सुरु असल्याने नागरिक व वाहचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. महापालिका प्रशासनाने या ठिकाणचे काम त्वरित पूर्ण करून नागरिकांची व वाहचालकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करावी, अशी अपेक्षाही राजेंद्र जगताप यांनी व्यक्त केली.

पावसाळापूर्व कामे ही पावसाळ्याच्या पूर्वी पूर्ण होणे अपेक्षित होते. पावसाळ्यात अशा कामांना परवानगी नसते. मात्र, कृष्णा चौकातील पावसाळी गटाराचे काम ऐन पावसाळ्यात सुरु केल्याने नागरिकांमधून संतापाचे वातावरण आहे. संथ गतीने काम सुरु आहे. यामुळे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. महापालिका आयुक्तांनीच यामध्ये लक्ष घालून काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी, ठेकेदारांना द्याव्यात.
               -राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस 


Share this Newz