राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने 5 ऑगस्ट रोजी दिल्लीत धरणे आंदोलन

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे :  ओबीसी आरक्षण कायम ठेवून जातीनिहाय जनगणना करावी, नॉन क्रिमीलेयरची अट रद्द करावी, महागाई कमी करावी, अशा विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने येत्या 5 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये ओबीसी समाजाने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष विनायक रुपनवर यांनी केले आहे. 
यासंदर्भात राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष विनायक रुपनवर, महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य बाळासाहेब कोकरे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ऍड. संजय माने, जिल्हा संपर्कप्रमुख अंकुश देवडकर, पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार, पुणे महिला अध्यक्ष सुनीताताई किरवे, वैशाली जाधव, राजेश लवटे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की शासनाने सर्व समाजाची जातीनिहाय जनगणना करून ओबीसी आरक्षण कायम करावे, नॉन क्रिमीलेयरची अट रद्द करावी, 50 टक्के सिलिंग हटवावे, सार्वजनिक संस्थांमध्ये संपूर्ण आरक्षण लागू करावे, न्यायव्यवस्था, केंद्रीय सार्वजनिक शैक्षणिक संस्थांमध्ये संपूर्ण आरक्षण लागू करावे, धान्य मालाला हमीभावाने खरेदीची हमी द्यावी, महागाई थांबवण्यासाठी ठोस पावले उचलावीत, संपूर्ण शिक्षण मोफत करावे, मोफत आरोग्य सुविधा पुरवाव्यात आधी मागण्या मान्य करण्याबाबत केंद्र सरकारकडे शिफारस करावी, अशा मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत.
दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर होणाऱ्या आंदोलनात ओबीसी समाजाने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Share this Newz