उपमुख्यमंत्री अजित पवार व नवनाथ जगताप भेटीमुळे राजकीय चर्चांना उधान

सांगवी - पिंपळे गुरवमधील राजकीय समीकरणे बदलणार
Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी :     2017 च्या महापालिका निवडणुकीत निवडून आलेले अपक्ष नगरसेवक नवनाथ जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधान आले आहे. दरम्यान, प्रशांत शितोळे यांना अजित पवार यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

मंगळवारी सर्व प्रभागातील आरक्षण जाहीर झाल्याने कोण कुठल्या प्रभागातून निवडणूक लढवणार, हे चित्र जवळजवळ स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक नवनाथ जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घेतलेली भेट महत्त्वाची ठरते. कारण 2017 च्या महापालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेल्या नवनाथ जगताप यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र, पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपच्या एकूणच कामकाजाच्या पद्धतीला कंटाळून त्यांनी भाजपपासून दूर राहण्याची भूमिका घेतली होती.

लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराचा नारळ नवी सांगवीतील साई मंदिरात साईंची आरती करून फोडण्यात आला होता. यामध्ये नवनाथ जगताप यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. तेव्हापासून नवनाथ जगताप यांच्या भूमिकेकडे सांगवी-पिंपळे गुरवकरांचे लक्ष लागले होते. अखेर आज त्यांनी शहर राष्ट्रवादी काँगेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अजित पवार यांची भेट घेतल्याने नवनाथ जगताप राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी अजित पवार यांनी नवनाथ जगताप व प्रशांत शितोळे यांना आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा सूचना केल्याचे समजते.

दरम्यान, नवनाथ जगताप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यास सांगवी, नवी सांगवी व पिंपळे गुरव परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून येण्यास मोठी मदत होणार आहे. कारण या संपूर्ण परिसरात नवनाथ जगताप यांना मानणारा युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिक, महिला या नवनाथ जगताप यांच्या कामावर खुश असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नवनाथ जगताप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यास महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढून कार्यकर्त्यांचे बळ वाढणार आहे. यापूर्वी नवनाथ जगताप यांच्या होर्डिंगवर आमदार जगताप यांचे निष्ठावंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब चौगुले व भाजपच्या नगरसेविका सीमा चौगुले झळकल्याने त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्याचवेळी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

आता त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे. हा निर्णय सांगवी – पिंपळे गुरव परिसराचे राजकीय बदल घडवून आणणारा असेल, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

 


Share this Newz