कृष्ण धवल’ चित्रांचा राजा उमाकांत कानडे

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे : 

पांढऱ्याशुभ्र कॅनव्हासवर काळ्या रंगाच्या रेषांनी रेखाटलेले निसर्गचित्रे, त्यातील पांढरे शुभ्र आकाश, उठावदार रंगातील आकर्षक पक्षी, वृक्ष सावलीत हलक्या लहरींचे जाणवत असलेले पाण्याचे अस्तित्व हे सारंच कला रसिकांच्या मनाचा ठाव घेणारं आहे. चित्रकार उमाकांत कानडे यांच्या चित्रातील त्र्मोक्चिल या माध्यमातून साकारलेल्या काळ्या रंगाच्या कमी अधिक जाडीच्या रेषांच्या गुंफणीतून तयार झालेला सहज सुंदर ‘कृष्ण धवल’ हा परिणाम अनेकांच्या नजरेला भुरळ घालत आहे.

निमित्त आहे आर्टक्युब गॅलेरिया, पुणेच्या वतीने शुभारंभ लॅन्स येथे भरवण्यात आलेल्या ‘इंटरनॅशनल आर्ट एक्स्पो’चे. यामध्ये देश विदेशातील अनेक चित्रकार, शिल्पकार सहभागी झाले आहेत. यामध्ये काळ्या रंगाच्या छटांचा उपयोग करून साकारलेली चित्रकार उमाकांत कानडे यांची चित्रे विशेष लक्ष वेधून घेत आहेत.

चित्रकार उमाकांत कानडे यांची आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार म्हणून ओळख आहे. गेल्या 25 वर्षांपासून ते भारती विद्यापीठातील रेखाकला – रंगकला विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांनी रेखाटलेली अनेक चित्रे ही देश – विदेशातील चित्र प्रदर्शनामध्ये झळकली असून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्गदर्शक म्हणूनही काम केले आहे. भारतात त्र्मोक्चिल या बोरू सारख्या माध्यमप्रकारात काम करणारे हाताच्या बोटावर मोजता येणारे चित्रकार आहेत. त्यात सर्वाधिक काम करणाऱ्या चित्रकारांमध्ये उमाकांत कानडे यांचे नाव पहिल्या क्रमांकावर येते.

उमाकांत कानडे यांनी त्र्मोक्चिल या माध्यमातून विकसीत केलेली ही त्यांची स्वतःची एक वेगळी शैली आहे. त्र्मोक्चिलच्या सहाय्याने ते केवळ काळ्या रंगाच्या अॅक्रेलीक रंगात ते तब्बल आठ ते नऊ वेगवेगळ्या छटा निर्माण करून चित्र रेखाटतात. काळा अॅक्रेलीक रंग तसाच न वापरता चित्रकार उमाकांत कानडे हे त्याची शाई बनवतात व मग तो रंग वापरतात. एक एक चित्र साकारताना त्यांना जवळपास 20 ते 25 दिवस लागतात.

या विषयी बोलताना उमाकांत कानडे म्हणाले, अभिनव कला महाविद्यालयातून 1990 साली शिक्षण घेतल्या नंतर मी कॉमिक मध्ये काम करायला सुरूवात केली. त्याचीच छाप माझ्या चित्रात दिसते. प्रसिद्ध चित्रकार दिलीप कदम हे माझे गूरू. आवड असल्यामुळे मी त्र्मोक्चिलच्या सहाय्याने चित्र काढण्याचा प्रयत्न करत गेलो. अनेक प्रयोगानंतर मी माझी वेगळी शैली निर्माण केली आहे. सहाजिकच फक्त काळ्या रेशांचा खेळ साधला असल्यामुळे ही चित्र वेगळी दिसतात.


Share this Newz