विद्यार्थ्यांमध्ये समग्र दृष्टिकोन निर्माण होणे आवश्यक: अधिष्ठाता डॉ. अंजली कुरणे

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे : बदलत्या शिक्षण पद्धतीनुसार कला, वाणिज्य व व्यवस्थापन, मूलभूत विज्ञान या अभ्यासक्रमामध्ये अनेक संकल्पना बदलत असून विद्यार्थ्यांनी एकाच विषयाकडे अनेक अंगाने बघणे गरजेचे आहे. तसेच यामध्ये निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये समग्र दृष्टिकोण निर्माण होणे आवश्यक असून त्यादृष्टीने बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये आयोजित विविध नाविन्यपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासामध्ये भर टाकणारे आहेत, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानव्यविद्या शाखेच्या अधिष्ठाता डॉ. अंजली कुरणे यांनी व्यक्त केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या ग्रीन ऑडिट, एनर्जी ऑडिट व एन्व्हायरमेंट ऑडिट या अहवालाच्या प्रकाशन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. लतेश निकम, डॉ. गौतमी पवार, डॉ. सचिन बनकर, डॉ. संगीता घोडके यांची विशेष उपस्थिती होती.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी शाश्वत विकासाकरिता पर्यावरण संवर्धन केंद्रस्थानी ठेवत महाविद्यालयातर्फे बनवण्यात आलेल्या ग्रीन ऑडिट, एनर्जी ऑडिट व एन्व्हायरमेंट ऑडिट या अहवालाविषयी सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर नवीन शैक्षणिक धोरण अमलात येत असताना शिक्षकांनी नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करत वेगळ्या धाटणीची शैली आत्मसात करावी, असे आवाहन करत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत आयोजित नवीन शैक्षणिक धोरण २०२० संबंधित कार्यशाळेविषयी माहिती दिली.

महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित या छोटेखानी समारंभाचे सूत्रसंचलन प्रा. भास्कर घोडके तर आभार प्रदर्शन प्रा. आशुतोष ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


Share this Newz