मावळ तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी मुकुंद ठाकर यांना राज्यपाल भगतसिंह कोषारी यांच्या हस्ते राज्यस्तरीय वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्रदान

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे : मावळ तालुक्यातील प्रगतीशील फुल उत्पादक शेतकरी मुकुंद ठाकर यांना राज्यपाल भगतसिंह कोषारी यांच्या हस्ते राज्यस्तरीय वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, धन्वंतरी सभागृह (नाशिक) येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.

यावेळी सन २०१७ – २०१८ – २०१९ या वर्षात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी व अधिकारी यांना राज्यस्तरीय वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

राज्यपाल भगतसिंह कोषारी यांच्या शुभहस्ते व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (ऑनलाईन पद्धतीने), उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दादाजी भुसे, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

मुकुंद ठाकर यांची व त्यांच्या पोलीहाऊस क्षेत्रातील सविस्तर माहिती :

मुकुंद ठाकर यांनी २००५ साली पोलीहाऊस व्यवसायात पदार्पण केले. दर्जेदार फुलांचे उत्पादन, बाजारातील फुलांची मागणी, फुल जास्त काळ टिकण्यासाठी गरजेच्या उपाययोजना यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जाऊन अनुभव घेतला. व त्यानुसार उत्पादन घेत त्यांनी फुल व्यवसाय सुरळीत चालू ठेवला. मावळ तालुक्यातील येळसे, भडवली, कडधे, वाहणगाव, टाकवे व मुळशी तालुक्यातील पौड अश्या विविध ठिकाणी त्यांचे एकूण ५० एकर क्षेत्रात पोलीहाऊस आहेत.

मुकुंद ठाकर यांना आतापर्यंत मिळालेले पुरस्कार :

मुकुंद ठाकर यांना आतापर्यंत २०१६ साली मावळ तालुका कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, २०१७ साली पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हास्तरीय कृषीनिष्ठ पुरस्कार व २०१८ साली राज्यस्तरीय वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार, २०१९ साली यशवंत मावळ भूषण पुरस्कार, त्याचबरोबर कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना अनेक संस्थांकडून यापूर्वी गौरविण्यात आले आहे.

तसेच कोरोनाच्या प्रदीर्घ कालखंडात लांबवला गेलेला २०१८ या वर्षाचा राज्यस्तरीय कृषीनिष्ठ पुरस्कार ठाकर यांना मिळाल्याने मावळ तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या माध्यमातून तालुक्याची मान अधिकच उंचावली गेली आहे. तालुक्यातील सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

माझा पुरस्कार मावळ तालुक्यातील शेतकरी बंधू – भगिनींना समर्पित – मुकुंद ठाकर

हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने तालुक्याच्या उज्वल वैभवात माझ्या स्वरूपाने भर पडल्याचा मला सार्थ अभिमान आहे. मावळ तालुक्यातील शेतकरी कष्टाने, जिद्दीने व शेती क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणारे शेतकरी असून त्या सर्व तरुण शेतकरी बंधू – भगिनींना हा पुरस्कार मी समर्पित करत आहे.


Share this Newz