आमदार लक्ष्मण जगताप यांचा उपचाराला प्रतिसाद; प्रकृतीत सुधारणा होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी : गेल्या आठवड्याभरापासून चिंचवड विधानसभेचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर बाणेर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हळूहळू ते उपचाराला प्रतिसाद देत असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलल्याचे वातावरण पहावयास मिळत आहे.
केंद्र तसेच राज्यातील भाजपा व इतर पक्षातील नेत्यांनी रुग्णालयात येऊन तसेच दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आमदार जगताप यांच्या तब्बेतीविषयी आस्थेने चौकशी केली. त्याचबरोबर शहरातील विविध सामाजिक संस्था, मंडळे, महिला व कार्यकर्ते यांच्याद्वारे विविध ठिकाणी देवदेवतांच्या मंदिरामध्ये जाऊन अभिषेक पूजा व महामृत्युंजय मंत्राचा जप करत आमदार जगताप यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
दरम्यान, केंद्रीय मंत्री, भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार, रामदास आठवले यांनी दूरध्वनीद्वारे आमदार जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्याशी संवाद साधत प्रकृतीविषयी विचारपूस केली. उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री राम शिंदे, संजय भेगडे, आमदार आशिष शेलार, राहुल कुल, भीमराव तापकीर, महेश लांडगे, माधुरी मिसाळ, सुनील शेळके, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, उषा उर्फ माई ढोरे यांच्यासह शहरातील भाजपा व अन्य पक्षातील शहर पातळीवरील नेत्यांनी रुग्णालयात येऊन जगताप बंधूंची भेट घेतली. यावेळी विजय जगताप, शंकर जगताप तसेच रुग्णालयाच्या डॉक्टरांशी संवाद साधत आमदार जगताप यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
सर्व स्थरातून करण्यात आलेली प्रार्थना, जनतेचे आशीर्वाद, वरिष्ठ नेत्यांनी दिलेला आधार याबद्दल आमदार जगताप यांचे बंधू शंकर जगताप व विजय जगताप यांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

Share this Newz