डॉ. तानाजी साळवे यांचा जीवन प्रवास भावी पिढीसाठी प्रेरणादायी: कुलगुरू डॉ. नितीन करमळकर

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे : माणूस ज्या वेळी आपल्या भूमिकेला न्याय देत विविध आव्हाने पेलत जातो त्यावेळेस तो खऱ्या अर्थाने परिपक्व होत असतो. एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्म घेत शिक्षक, प्राचार्य अशी यशस्वी वाटचाल केलेले दिवंगत प्राचार्य डॉ. तानाजी साळवे यांचे कार्य व कर्तुत्व खरोखरच आदर्शवत असे आहे. त्यांचे कुटुंब, विद्यार्थी व सहकारी यांच्या प्रयत्नातून त्यांच्या कार्याची माहिती देणारे ‘शून्यातून विश्वाकडे’ हे पुस्तक फक्त आठवणींचा संग्रह नसून, येणाऱ्या पिढीसाठी मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी केले.

महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या संस्थेमधील दिवंगत प्राचार्य डॉ. तानाजी साळवे यांच्या संघर्ष व जीवन प्रवासावर प्रकाश टाकणाऱ्या ‘शून्यातून विश्वाकडे’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सहसचिव (प्रशासन) ए. एम. जाधव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, वाणिज्य व व्यवस्थापन शाखा अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, निवृत्त प्राध्यापक डॉ. संतोष दास्ताने, प्राचार्य फोरमचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार निकम, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे,डॉ. संगीता साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. तानाजी साळवे यांचे अतिशय जवळचे मित्र व बाबुरावजी घोलप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी आदर्श कुटुंब प्रमुख, उत्तम मित्र व उत्तम प्रशासक यांचा एकत्रित संगम म्हणजे डॉ. तानाजी साळवे असे नमूद करत शिक्षक, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, प्राचार्य म्हणून सोबत काम करत असतानाचे अनेक अनुभव मांडले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी त्यांनी कसलाही गाजावाजा न करता नियोजनबद्ध काम पूर्ण करणे ही डॉ. तानाजी साळवे यांची काम करण्याची अनोखी शैली होती, असे मत व्यक्त करत समता व पुरोगामी मूल्यांचा पुरस्कार करत शेवटपर्यंत त्यांनी आपली वैचारिक भूमिका पक्की ठेवली होती असे स्पष्ट केले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सहसचिव ए. एम. जाधव यांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विविध महाविद्यालयामध्ये काम करत असताना डॉ. तानाजी साळवे यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला होता असे नमूद केले.

या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या सुरूवातीला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, अर्थ व व्यवस्थापन शास्त्राचे निवृत्त प्राध्यापक डॉ. संतोष दास्ताने, प्राचार्य फोरमचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार निकम, प्राचार्य नितीन घोरपडे, डॉ. संगीता साळवे, प्राचार्या डॉ. सुषमा भोसले, प्राचार्य डॉ. तुषार शितोळे, प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे, डॉ. भास्कर जंगले, डॉ. विलास आढाव, डॉ. निशा भंडारे, डॉ. सुभाष पाटील, डॉ. जितेंद्र वडशिंगकर, प्रा. गव्हाळे सर, श्री. दत्तू झेंडे, प्रा. सारिका मोहोळ यांच्यासह विद्यार्थी व सहकारी शिक्षकांनी आपले अनुभव व्यक्त केले. यावेळी अनुभव व्यक्त करत असताना सर्वजण भावूक झाले होते.

सूत्रसंचालन डॉ. सविता कुलकर्णी यांनी, तर आभार मीनल भोसले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी संगीता साळवे, गौरी साळवे, हर्षद जाधव, मीनल भोसले, सचिन काळे, प्रणित पावले यांनी परिश्रम घेतले.


Share this Newz