संवादातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे आवश्यक : राजेंद्र घाडगे

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे : 

उच्च माध्यमिक वर्गामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बारावीनंतरच्या महाविद्यालयीन जीवन, शिक्षण, वातावरण याबद्दल कमालीची उत्सुकता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आकलन करून त्यांचा भविष्यातील शिक्षणाप्रती कल लक्षात घेणे गरजेचे असून बदलती शिक्षण पद्धती, अभ्यासक्रम, भाषाविषयक न्यूनगंड या सर्व बाबींचा विचार करता प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचा आत्मविश्‍वास वाढीस लावणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे यांनी केले.

बारावीनंतर मूलभूत विज्ञानामधील उच्च शिक्षणाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, या उद्देशाने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील विज्ञान असोसिएशनतर्फे आयोजित ‘स्कूल टू कॅम्पस’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. लतेश निकम, विज्ञान असोसिएशन समन्वयक डॉ. विजय घाडगे उपस्थित होते.

या उपक्रमाबद्दल अधिक माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी ‘स्कूल टू कॅम्पस’ ही एक आगळी – वेगळी संकल्पना आहे असे नमूद करत मूलभूत विज्ञानामधील भारत सरकारच्या विविध संशोधन संस्था, आयआयटी, आयसर, विद्यापीठे येथील अभ्यासक्रम व संशोधनाच्या विविध संधी बद्दल थोडक्यात मार्गदर्शन केले. तसेच आज विज्ञानामधील अनेक शोध मूलभूत विज्ञानामध्ये लागत आहेत असे स्पष्ट करत अशा प्रकारच्या उपक्रमांमधून महाविद्यालयीन जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये मुलभूत विज्ञानाचा कल वाढला पाहिजे असा आग्रह धरला.
या उपक्रमांतर्गत बाबुरावजी घोलप कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी व बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी वरिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान विभागांना भेटी दिल्या. यामध्ये महाविद्यालयातील गणित व संख्याशास्त्र विभागामध्ये पायथोन प्रोग्रामिंग लँग्वेज आणि मॅक्झिमा सॉफ्टवेअर तर भौतिकशास्त्र विभागामध्ये साऊंड – माईक सिस्टिम, ध्वनी लहरी, लॉजिक गेट्स, टेलिस्कोप यांची प्रात्यक्षिकासह ओळख करून देण्यात आली. तसेच वनस्पती शास्त्र विभागांमध्ये पेशी व पेशींचे प्रकार, पानांचे प्रकार, टिपीकल फ्लॉवर तर प्राणीशास्त्र विभागामध्ये अनुवंशिकता, मानवी उत्क्रांती यांवर सविस्तर प्रकाश टाकण्यात आला. इंट्रोडक्शन टू अपार्टस, वॉल्युमेट्रीक डायट्रेशन याबद्दल रसायनशास्त्र विभागामध्ये माहिती देण्यात आली.

सदर उपक्रमामध्ये कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतील सुमारे १२० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी भेट देत या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये भाग घेण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे व विज्ञान असोसिएशनचे आभार मानत आनंद व्यक्त केला. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. विजय घारे, डॉ. सतीश एकार, डॉ. चंदा हासे, डॉ. वैशाली बन्सोड, प्रणित पावले यांच्यासह विज्ञान असोसिएशनच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


Share this Newz