घोलप महाविद्यालयामध्ये ‘सायंटिफिक पोस्टर प्रेझेन्टेशन’ स्पर्धा संपन्न

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पुणे : 

माजी केंद्रीय कृषिमंत्री पद्मविभूषण मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती वाढीस लागावी व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने सांगवी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये विद्यार्थी विकास समिती व विज्ञान असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सायंटिफिक पोस्टर प्रेझेन्टेशन’ स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.

बाबुरावजी घोलप महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी उपप्राचार्य डॉ. लतेश निकम, समन्वयक विजय घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते स्पर्धेचे प्रास्ताविक करत असताना स्पर्धा समन्वयक डॉ. विजय घाडगे यांनी पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेची संकल्पना स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विषयावर भाष्य केले.

प्राचार्य डॉ.नितीन घोरपडे यांनी सर्वप्रथम माहिती तंत्रज्ञान, आरोग्य, पर्यावरण व जैव विविधता संवर्धन तसेच विविध चालू विषयावर माहितीपूर्ण पोस्टर प्रेझेंटेशन केल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण होणे आवश्यक आहे असे नमूद करत बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी स्वतःला अद्ययावत ठेवत समाजहितकारक व पर्यावरण पूरक संशोधनाला दिशा देणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले.
सदर स्पर्धेमध्ये विज्ञान शाखेतील सुमारे १८ विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. यामध्ये प्रथम वर्ष बीएस्सी (संगणक शास्त्र) च्या अभिनव ऐडके याने ‘संगणकीकरण – फायदे व तोटे’ या विषयावर सादर केलेल्या सादरीकरणाला प्रथम क्रमांक मिळाला. तसेच तृतीय वर्ष बीएस्सी वर्गातील शुभम दौंड याने ‘सर्प संवर्धन’ या विषयावर द्वितीय क्रमांक तर हर्षदा जाधव (तृतीय वर्ष बीएस्सी) व आर्यन टकले (तृतीय वर्ष बीएस्सी) यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला. ‘मधुमक्षी संवर्धन’ आणि ‘कोरोना व आरोग्य’ या विषयावर अनुक्रमे त्यांनी सादरीकरण केले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. विजय घाडगे, प्रा. सोनल कदम, डॉ. ज्योती कदम यांनी काम पाहिले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्रजी घाडगे, मानद सचिव अॅड. संदीप कदम, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख यांच्यासह सर्व पदाधिकारी, महाविद्यालय विकास समिती सदस्य यांनी अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


Share this Newz