प्रभावी व्यक्तिमत्वासाठी वक्तृत्व कौशल्य आवश्यक : प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे 

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पुणे : 

वक्तृत्व हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा व व्यक्तिमत्त्व विकासाचा एक अविभाज्य घटक आहे. तसेच तेजस्वी व ओघवत्या वक्तृत्वशैलीच्या माध्यमातून समोरच्याला आकर्षित करून आपल्या विचारांची छाप पाडण्याचे कौशल्य वक्तृत्वामध्ये असते. त्यामुळेच प्रभावी व्यक्तिमत्त्वासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनापासूनच विविध वक्तृत्व व वादविवाद स्पर्धांमध्ये सहभाग घेत आपले वक्तृत्व कौशल्य वाढीस लावावे, असे आवाहन बाबुरावजी घोलप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी केले.

माजी केंद्रीय कृषिमंत्री पद्मविभूषण शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने सांगवी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये मराठी विभाग व विद्यार्थी विकास समिती व विज्ञान असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मराठी विभागप्रमुख प्रा. सुवर्णा खोडदे, विद्यार्थी विकास समिती समन्वयक डॉ. विजय घाडगे, डॉ. विजय बालघरे, डॉ. माया माईनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या विविध विभागातील २२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये तृतीय वर्ष बीएस्सी वर्षातील हर्षदा जाधव हिने प्रथम क्रमांक मिळविला तर एमएस्सी रसायनशास्त्र विभागातील तनय सुतार याला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. तृतीय क्रमांक पिंकी चौधरी व राधिका कारके यांना विभागून देण्यात आला.

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. माया माईनकर, डॉ. विजय बालघरे, डॉ. विजय घाडगे या तज्ञांनी काम पाहिले.
या स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा खोडदे तर आभार प्रदर्शन डॉ. विजय बालघरे यांनी केले. यावेळी विविध विषयावरील विद्यार्थ्यांची मते ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये उपस्थित होते.


Share this Newz