छात्र सेनेमुळे राष्ट्रभक्तीची गोडी निर्माण होण्यास मदत : अॅड. मोहनराव देशमुख

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पुणे : 

भारतीय स्वातंत्र्यानंतर पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय छात्र सेनेची सुरुवात झाली. विद्यार्थिदशेपासूनच विद्यार्थ्यांमध्ये स्वंयशिस्त व एकता या गुणांची बीजे रोवण्यास मदत होण्याबरोबरच राष्ट्रीय छात्र सेनेमध्ये मिळालेले अनुभव व प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये महाविद्यालयीन जीवनापासूनच राष्ट्रभक्तीची गोडी निर्माण होण्यास मदत झाली, असे प्रतिपादन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख यांनी केले.
राष्ट्रीय छात्र सेना दिनानिमित्त सांगवी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना विभागातर्फे आयोजित ‘रँक डिस्ट्रीब्यूशन’ या विशेष कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, सकाळ सत्र प्रमुख डॉ. वंदना पिंपळे, छात्र सेना अधिकारी लेफ्ट. विठ्ठल नाईकवाडी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना लेफ्ट. विठ्ठल नाईकवाडी यांनी युवावर्गाला दिशा मिळावी या उद्देशाने सुरू झालेल्या राष्ट्रीय छात्र सेनेचे महत्त्व विशद करत राष्ट्रीय छात्र सेना दिनाची संकल्पना स्पष्ट केली. तसेच राष्ट्रीय छात्र सेनेमधील विविध घटकांची सविस्तर माहिती देत उपस्थित छात्रांसमोर प्रशिक्षणाची उद्दिष्टे नमूद केली.

उपस्थित छात्रांना मार्गदर्शन करत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी सर्वप्रथम राष्ट्रीय छात्र सेना दिवसाच्या समारंभासाठी छात्रांनी घेतलेल्या अथक परिश्रमाबद्दल त्यांचे कौतुक करत राष्ट्रीय छात्र सेना शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनण्यासाठी आवश्यक गुण वाढीस लागून त्यांच्या सुप्त गुणांचा विकास होतो, असे मत व्यक्त केले. तसेच छात्र सेनेमध्ये काम करत असताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते असे नमुद करत एनसीसी मुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण वाढीसाठी निर्माण होणाऱ्या क्षमतेबद्दल मार्गदर्शन केले.

यावेळी एनसीसी छात्रांना प्रेरणा मिळावी व त्यांच्याकडुन देशसेवा घडावी या हेतूने छात्रांना रँक देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी संपूर्ण जगभरामध्ये कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरीएंटचा धसका घेतलेला असताना राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांनी स्वंयशिस्तीचे प्रदर्शन करत शारीरिक अंतर राखण्याचा व मास्क वापरण्याचा सामाजिक दृष्टीने संदेश दिला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅडेट सानिका गवस, संचिता मोहिते तर आभार प्रदर्शन डॉ. वंदना पिंपळे यांनी केले.
कोविड – १९ विषयक शासन नियमांचे पालन करतात महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित या कार्यक्रमाचे यु – ट्युब लाईव्हवर थेट प्रक्षेपण करण्यात आले. या करिता प्रा. सोनल कदम व प्रणित पावले यांनी विशेष तांत्रिक सहकार्य केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. विजय घारे, डॉ. चंदा हासे, डॉ. मेधा मिसार, डॉ. शकुंतला माने, डॉ. क्रांती बोरावके, प्रा. सोनल कदम, प्रा. सद्दाम घाटवाले, प्रा. संतोष सास्तुरकर, डॉ. सविता वासुंडे, प्रा. धनश्री कुलकर्णी, प्रणित पावले, सिनिअर अंडर ऑफिसर शुभम दौंड, कॅडेट ओंकार वळसे, कॅडेट लकी जोशी, कॅडेट हर्षदा फुगे यांच्यासह राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांनी परिश्रम घेतले.


Share this Newz