खोदकाम केलेल्या रस्त्यांची कामे पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्या; आमदार जगताप यांची अधिकाऱ्यांना सूचना

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पिंपरी : 

चिंचवड विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विविध विकासकामांना गती देऊन ती लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत. खोदकाम केलेल्या रस्त्यांची कामे पूर्ण करून नागरिकांना दिलासा देण्याची सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.

आमदार जगताप यांनी महापालिका अधिकाऱ्यांची पिंपळे गुरव येथील जनसंपर्क कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीला महापौर माई ढोरे, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे सर्व नगरसेवक, महापालिकेचे शहर अभियंता, स्थापत्य विभागातील कार्यकारी अभियंता, उपअभियंता उपस्थित होते.

महापालिकेच्या स्थापत्य विभागामार्फत चिंचवड विधानसभा मतदारसंघात अनेक कामे सुरू आहेत. रस्ते, जलनिस्सारण, ग्रेडसेपरेटर यांसह अनेक मोठी कामे सुरू आहेत. मात्र, ही कामे संथ गतीने सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार लक्ष्मण जगताप यांनी ही बैठक घेतली. या बैठकीत आमदार जगताप यांनी मतदारसंघातील प्रत्येक लहान-मोठ्या कामाचा आढावा घेतला. प्रत्येक कामनिहाय संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली. कामे संथ गतीने का सुरू आहेत? कामांना निधी कमी पडतोय की तुम्ही कर्तव्य बजावण्यात कमी पडताय? याची अधिकाऱ्यांना विचारणा केली. मात्र, अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. कामांच्या गतीबाबत अधिकाऱ्यांकडून कोणतेच समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आमदार लक्ष्मण जगताप यांनी नाराजी व्यक्त केली.
कामांचा वेग वाढविण्याच्या सूचना करीत खोदकाम केलेल्या रस्त्यांची कामे सर्वात आधी पूर्ण करा, नागरिकांना लवकरात लवकर दिलासा मिळेल, असे काम करा, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.


Share this Newz