धर्मादाय अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांना ‘धर्मादाय’ शब्द नावात वापरणे बंधनकारक

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी : 

पुणे शहरातील रुबी हॉल, जहांगीर हॉस्पिटल, पूना हॉस्पिटल, संचेती हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल ही सर्व हॉस्पिटल धर्मादाय आयुक्‍तालयाच्या अंतर्गत येत असल्याची कल्पना रुग्णांना नसल्यामुळे रुग्ण या रुग्णालयांच्या चकचकीतपणाकडे बघत घाबरत होते. मात्र, आता पुण्यातील अशा 56 रुग्णालयांना ‘धर्मादाय’ शब्द नावापुढे लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

याबाबत आमदार लक्ष्मण जगताप यांनी वेळोवेळी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करुन मुख्यमंत्री व धर्मादाय आयुक्तांना पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला. आज अखेर या प्रयत्नाला यश आले आहे. याचा फायदा संपुर्ण महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला होणार आहे.

उंच व चकचकीत रुग्णालये ही धर्मादाय अंतर्गत येतात, याची कल्पनाच अनेक रुग्णांना नसते. त्यामुळे अनेक रुग्ण सवलतीच्या दरांतील तसेच मोफत उपचारांच्या योजनेपासून वंचित राहतात. पुढील काळात असे होऊ नये, म्हणून आता या धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या नावापुढे धर्मादाय हा शब्द लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे पुण्यातील ५६ धर्मादाय रुग्णालयांना धर्मादाय हा शब्द त्यांच्या नावापुढे लावावा लागणार आहे.

राज्यातील सर्व रुग्णालयांना आदेश लागू
धर्मादाय शब्द लावण्याबाबतचा निर्णय संपूर्ण राज्यासाठी लागू आहे. राज्यात एकूण ४३० धर्मादाय रुग्णालये असून, त्यांतर्गत दहा टक्के खाटा या १ लाख ८० हजार वार्षिक उत्पन्न असलेल्या आर्थिक दुर्बलांसाठी, तर आणखी दहा टक्के खाटा या निर्धन ८५ हजार वार्षिक उत्पन्न असणाऱ्या रुग्णांसाठी राखीव आहेत. आर्थिक दुर्बल रुग्णांना उपचारांमध्ये ५० टक्के सवलत, तर निर्धन रुग्णांना पूर्णपणे मोफत उपचार मिळण्याची तरतूद उच्च न्यायालयाने २००३ मध्ये एका निकालाद्वारे केली आहे.

राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या नावापुढे ‘धर्मादाय’ हा शब्द लावण्याचे निर्देश बैठकीत दिले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना ते रुग्णालय धर्मादाय आहे की नाही याची माहिती होईल. वरून कॉर्पोरेट वाटणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांत गरीब रुग्णांना उपचार घेता येईल.

-आमदार लक्ष्मण जगताप


Share this Newz