तब्बल ११ वेळा एकाच विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले, सर्वसामान्य जनतेप्रती, त्यांच्या प्रश्नांसाठी तळमळ असणारे, शेतकरी कामगार पक्षाचे नेते, सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले.
शुक्रवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात गणपतराव देशमुखांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सत्शील राजकारणातला एक तारा निखळल्याची खंत व्यक्त होत आहे. भाई गणपतराव देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्य़ातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा विक्रमी विजय मिळविला आहे. २००९ च्या निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते. नरेंद्र मोदी यांच्या लाटेतही त्यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. २०१८ च्या निवडणुकीत मात्र त्यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता.
अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले होते. देशमुख हे सांगोल्यात सर्वप्रथम १९६२च्या निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर १९७२ आणि १९९५ चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत सांगोल्यातील मतदारांनी त्यांनाच भरभरून मते दिली. २०१२ मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सभागृहाने तसेच सरकारने त्यांचा गौरव केला होता.
गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते. मात्र, १९७८ मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापण केले, तेव्हा आणि १९९९ मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला, तेव्हा अशा दोन वेळा गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता.
टेंभू, म्हैसाळ योजनेचे पाणी दुष्काळी भाग असलेल्या सांगोल्यात आणण्यासाठी त्यांनी भगीरथ प्रयत्न केले होते. सांगोल्याच्या दुष्काळाचा कलंक त्यांनी पुसून या परिसराला सुजलाम्-सुफलाम केले. सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करीत शेतकरी, कष्टकर्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय त्यांनी केली. कापसाला हमीभाव देण्यासाठी सांगोला तालुका शेतकरी सहकारी सूत गिरणीची स्थापना करीत त्यांनी ती उत्तमपणे चालवून दाखविली.







Leave a Review