उद्योजकांवर गप्प बसून बुक्क्यांचा मार : अभय भोर

पीएमपीएमएल बससेवा सुरू ठेवण्याची फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनची मागणी
Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने पुण्यात काही निर्बंध घातले आहेत. यामध्ये पीएमपीएमएल बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे. परिणामी कर्मचाऱ्यांअभावी कंपन्यांमधील मशिनरी बंद पडून उद्योगावर परिणाम होणार आहे. त्यामुळे पीएमपीएमएल बससेवा सुरू ठेवावी, अशी मागणी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात पुणे परिसरातून 50 टक्के कर्मचारी कामास येतात. कर्मचारी गैरहजर असल्यास अनेक मशनरी बंद पडून त्याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम जाणवणार आहे. आधीच उद्योगांवर मंदीचा मोठा परिणाम झालेला आहे. त्यातूनही उद्योग चालू ठेवले; परंतु आता कर्मचाऱ्यांअभावी उद्योग चालवणार तरी कसे, हा प्रश्न उद्योजकांपुढे उपस्थित झाला आहे.

सायंकाळी सहा ते सकाळी सहा या वेळेत बस बंद ठेवण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा असून, संध्याकाळी आठ ते सकाळी सहा या वेळेत बस सेवा बंद ठेवण्यास हरकत नाही. परंतु संध्याकाळी कर्मचारी कामावरून सुटल्यानंतर त्यांना घरी जाण्याचा मार्ग बंद होणार असून, त्यामुळे कर्मचारी कामास येण्यास टाळाटाळ करतील आणि त्याचा  परिणाम उद्योगांवर जाणवणार आहे. कामगार वर्गासाठी पीएमपीएमएल बस सेवा उपलब्ध करावी आणि ओळखपत्रानुसार प्रवेश द्यावा, अशी मागणी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन मार्फत आयुक्तांकडे करण्यात आलेली आहे, असे फोरमचे अध्यक्ष अभय भोर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.


Share this Newz