The Newz Biz Team, मुंबई
माहिती तंत्रज्ञान आणि माहिती सुरक्षिततेचे परीक्षण तसेच सल्ला सेवा या व्यवसायात असलेल्या ए ए ए टेक्नोलॉजीजची पहिली समभाग विक्री येत्या ३० सप्टेंबरपासून सुरु होत आहे. यासाठी १० रुपये दर्शनी मूल्याचे २४,३६,००० समभाग प्रत्येकी ४२ रुपये या किमतीला एनएसइ इमर्ज या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असून, कंपनी या विक्रीमधून एकूण १०.२३ कोटी रुपये उभे करणार आहे.
समभाग विक्रीची किंमत बोनसपश्चात सरासरी प्रति समभाग उत्पन्न या आधारावर असलेले ९:१३ मूल्य / परतावा प्रमाण गृहीत धरून ठरवण्यात आली आहे. चार्टर्ड फायनान्स मॅनेजमेंट लिमिटेड हे या भागविक्रीचे प्रमुख व्यवस्थापक आहेत, तर एनएनएम सिक्युरिटीज मार्केट मेकर आणि लिंक इन टाइम इंडिया प्रा. लि. हे रजिस्ट्रार आहेत. या भागविक्रीतून उभारलेला निधी भारतातील विविध शहरांत व्यवसायाचे जाळे वाढवणे, खेळते भांडवल उभे करणे आणि कंपनीच्या दैनिंदिन कामकाज चालवणे यासाठी वापरला जाईल.
कंपनीला एक दशकाहून अधिक अनुभव असून, माहिती तंत्रज्ञान आणि माहिती सुरक्षिततेचे परीक्षण या व्यवसायात असलेली ती पहिली नोंदणीकृत कंपनी असेल. या व्यवसायात कंपनीचे एक खास स्थान आहे. कंपनीचे प्रवर्तक अंजय अगरवाल आणि वेणुगोपाल धूत हे दीर्घकाळ अनुभव घेतलेले उद्योजक आहेत.
अंजय अगरवाल हे माहिती सुरक्षितता क्षेत्रात नामवंत असून त्यांना देशातील तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील २० वर्षांचा अनुभव आहे. कोबीट सर्टिफाइड असेसर हा मान मिळालेली ते जगातले ५५ वे व्यावसायिक आहेत. आयएसएसीए (युएसए); आयएसएसीए मुंबई शाखा, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया अशा अनेक सरकारी आणि व्यावसायिक संस्था संघटनांशी त्यांचे संबंध आहेत आणि त्यांनी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान पुरस्कार साठी पंच म्हणून काम पहिले आहे. आयएसएसीए या माहिती सुरक्षा व्यावसायिकांच्या जागतिक संघटनेच्या सरकारी आणि नियामक संस्था समितीचे अध्यक्ष म्हणून निवडले जाणारे ते पहिले आशियाई व्यक्ती होते. आयएसएसीए मुंबई शाखेशी त्यांचा २०००-२००१ पासून अध्यक्ष (२००६-०७) आणि इतर विविध पदांवर काम केल्यामुळे संबंध आला. आय एस ए सी ए च्या जागतिक पातळीवरील कामात त्यांचा विविध समित्यांचे सदस्य म्हणून सहभाग होता. २०१३-२०१४ आणि २०१२-२०१३ मध्ये ते आयएसएसीए इंटरनॅशनल च्या परीक्षण समितीचे सदस्य होते तर २०११-२०१२ मध्ये वित्त समितीचे सदस्य होते. ते २००३-०४ मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया च्या माहिती तंत्रज्ञान समितीचे स्वीकृत सदस्य होते आणि २००२ आणि २००८ मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया च्या पश्चिम विभागीय मंडळाच्या माहिती तंत्रज्ञान समितीचे स्वीकृत सदस्य होते. त्यांनी आजवर माहिती सुरक्षितता / सायबर सुरक्षितता विषयक १०००० हून जास्त प्रकरणे हाताळली आहेत.
कंपनी मुख्यतः माहिती तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षा परीक्षण या व्यवसायात आहे. माहिती प्रणाली परीक्षण, माहिती तंत्रज्ञान हमी आणि पूर्तता आणि माहिती तंत्रज्ञान कामात सचोटी याविषयीच्या सेवाही देते. बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील संस्था, सरकारी क्षेत्रातील संस्था, नियमन संस्था आणि सरकारी तसेच खाजगी क्षेत्रातील संस्था कंपनीचे ग्राहक आहेत. कंपनीने २०१९-२० या वर्षात १४ कोटी २५ लाख रुपये तर २०१८-१९ या वर्षात १० कोटी ४८ लाख रुपये आणि २०१७-१८ या वर्षात १० कोटी ४० लाख रुपये उत्पन्न मिळवले. करोत्तर नफा २०१९-२० या वर्षात ३कोटी ७० लाख रुपये तर २०१८-१९ या वर्षात २ कोटी ६ लाख रुपये आणि २०१७-१८ या वर्षात ९९ लाख ९७ हजार रुपये होता.
ए ए ए टेक्नोलॉजीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अंजय अगरवाल म्हणाले, ए ए ए टेक्नोलॉजीज माहिती तंत्रज्ञान सुरक्षा, परीक्षण आणि सल्ला सेवा या क्षेत्रांमधील व्यापक क्षमतेच्या आधारावर ग्राहकांना सुरक्षित माहिती तंत्रज्ञान प्रणाली वापरणे शक्य करून देत आहे. आपले कार्यक्षेत्र कोणत्याही एकाच क्षेत्रापुरते मर्यादित न ठेवता काम केल्यामुळे आमच्या व्यवसायाची जोखीम कमी राखण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. सुमारे दोन दशकांचा अनुभव, सक्षम टीम आणि ग्राहकांबरोबरचे दीर्घकालीन संबंध यामुळे कंपनीला मोठी व्यवसायवृद्धी घडविण्याची आणि आमच्या व्यवसाय क्षेत्रात आघाडीवर राहून नफा क्षमता वाढविण्याची संधी आहे. माहिती प्रणाली परीक्षण, माहिती तंत्रज्ञान हमी आणि पूर्तता आणि माहिती तंत्रज्ञान कामात सचोटी हे आमच्या व्यवसायाचे मुख्य भाग आहेत.







Leave a Review