महापौर माई ढोरे : पंतप्रधान आवास योजनेचे फॉर्म भरण्यास मुदतवाढ द्यावी

महापौर माई उर्फ उषा ढोरे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
Share this Newz

The Newz Biz Team, पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत असून, नागरिकांकडून 15 ऑगस्ट 2020 ते 17 सप्टेंबर 2020 या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. मात्र, अनेक नागरिकांकडे कागदपत्रे गोळा करण्यास वेळ मिळालेला नाही. परिणामी अशा नागरिकांना या योजनेचे फॉर्म भरता आलेले नाहीत. त्यामुळे या योजनेसाठीचे फॉर्म भरण्यास 17 सप्टेंबरनंतर पुढील 15 दिवस मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी महापौर माई उर्फ उषा ढोरे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

महापालिका आयुक्तांना दिलेल्या अर्जात महापौर माई ढोरे यांनी म्हटले आहे, की कोविड19 च्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या लॉकडाऊन अनेक उद्योग व्यवसाय बंद असल्याने नागरिकांच्या हाताला काम नव्हते. अद्यापही या परिस्थितीत सुधारणा झालेली नसून, नागरिकांना जीवन जगण्याची भ्रांत पडली आहे. तसेच कोविड19 मुळे या योजनेसाठी आवश्यक ती कागदपत्रे नागरिकांना गोळा करता आलेली नाहीत. त्यामुळे अद्याप अनेक नागरिकांना या योजनेचे फॉर्म मुदतीत भरता आलेले नाहीत. या सर्व गोष्टींचा विचार करून महापालिका आयुक्तांनी अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकानंतर म्हणजे 17 सप्टेंबर नंतर पुढील पंधरा दिवस मुदतवाढ देण्यात यावी.

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी गरीबी निर्मूलन मंत्रालयाच्या वतीने पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे. ’सर्वांसाठी घरे’ या उपक्रमाअंतर्गत महापालिका क्षेत्रात पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे. महापालिकेने या संदर्भातील ठराव 20 जून 2017 ला मंजूर केला होता. त्यानंतर च-होली, रावेत आणि बो-हाडेवस्ती येथे आर्थिकदृष्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी घरे बांधण्याचे काम सुरू केले आहे. शहरातील दहा ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेअंतर्ग घरे निर्माण होणार आहेत. त्यातील तीन ठिकाणचे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत.

या योजनेत 30 चौरस मीटरचे घरकुल असून प्रत्येक प्रकल्पामध्ये 14 ते 15 मजली इमारत असणार आहे. घरकुलांसाठी लकी ड्रॉ काढण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलासाठी केंद्र शासनाकडून दीड लाख आणि राज्य शासनाकडून एक लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येत आहेत. त्यानंतर अर्जाची प्रिंट काढून नागरी सुविधा केंद्रामध्ये सादर करावी लागणार आहे.

अनेक नागरिकांकडे कागदपत्रे गोळा करण्यास वेळ मिळालेला नाही. परिणामी अशा नागरिकांना या योजनेचे फॉर्म भरता आलेले नाहीत. त्यामुळे या योजनेसाठीचे फॉर्म भरण्यास 17 सप्टेंबरनंतर पुढील 15 दिवस मुदतवाढ देण्यात यावी.

– महापौर माई उर्फ उषा ढोरे


Share this Newz