बँकांच्या थकीत रकमेवर चक्रवाढ व्याज ?

सरकारने लक्ष घालण्याची अभय भोर यांची मागणी
Share this Newz

पुणे : बँकांच्या थकीत रकमेवर चक्रवाढ व्याज लावत असल्याने उद्योजक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे सरकारने यामध्ये लक्ष घालून ठोस पावले उचलावीत, अशी मागणी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

अभय भोर म्हणाले, की गेले तीन – चार महिने सर्व उद्योग बंद अवस्थेमध्ये होते. या काळात उत्पादन बंद असल्यामुळे अनेक उद्योगांना बँकांची देणी, कामगारांचे पगार, तसेच अनेक शासकीय कर अशा प्रकारचा आर्थिक भार एकदम उचलावा लागला आहे. या काळात केंद्र सरकारने बँक विषयक धोरण जाहीर करून हप्त्यांमध्ये मुदतवाढ दिली; परंतु पुन्हा उद्योग सुरू झाल्यानंतर उद्योगांना मालाची मागणी नसल्यामुळे कामे उपलब्ध होऊ शकली नाहीत. अनेक उद्योगांना कामगार वर्ग नसल्याने आपले उत्पादन कमी प्रमाणात करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन संपल्यानंतर अनेक बँका उद्योजकांकडे आपल्या थकीत कर्जाबाबत सातत्याने मागणी करत असून, या उद्योगांना एनपीए अकाऊंटमध्ये टाकण्याची धमकी दिली जाते. आधीच कंपन्यांकडून वेळेत बिलांचे पैसे मिळालेले नाहीत आणि त्यात उद्योजकांनी खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन अनेक कामगारांचे पगार दिले आहेत. एकीकडे बँकांची देणी देण्यासाठी उद्योजकांना सातत्याने मागणी केली जात आहे आणि दुसरीकडे खाजगी सावकारी पाशामध्येही अनेक उद्योजक अडकले आहेत. अनेक उद्योजकांना आत्महत्या करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

सरकारने बँकांना अशा प्रकारचे निर्देश देणे महत्त्वाचे ठरेल, की जेणेकरून उद्योजकांना स्थिरस्थावर होण्यास वेळ मिळेल व अनेक उद्योग एमपी अकाउंटमध्ये जाण्यापासून वाचतील. तरच महाराष्ट्रातील उद्योग वाढतील, अन्यथा जे शिल्लक उद्योग आहेत, तेही कमी होऊन महाराष्ट्राच्या जीडीपी’वर मोठ्या प्रमाणात याचा परिणाम दिसून येईल, असे फोरमचे अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले


Share this Newz