जिच्या वक्तव्याला पाच पैशाची किंमत नाही, तिच्या जाळ्यात शिवसेना का अडकतेय?

Share this Newz

मुंबई : ‘जिच्या वक्तव्याला पाच पैशांची किंमत नाही. केवळ प्रसिद्धीसाठी जी व्यक्ती काहीही बोलतेय, तिच्या जाळ्यात शिवसेना का अडकतेय? शिवसेना इतकी निर्बुद्ध आहे का? याचा विचार मीडिया व जनतेने करावा,’ असे मत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी व्यक्त केले आहे.

अभिनेत्री कंगनाने मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून सध्या मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. कंगनाच्या विरोधात शिवसेना अधिकच आक्रमक झाली आहे. तिच्या फोटोला जोडे मारण्याचे आंदोलन केले जात आहे. थोबाड फोडण्याची भाषा केली जात आहे. हा सगळा गदारोळ जाणीवपूर्वक घडवला जात असल्याचा आरोप मनसेचे संदीप देशपांडे यांनी केला आहे.
‘कोरोनामुळे राज्यात सध्या भयंकर परिस्थिती आहे. लाखो लोक बेरोजगार आहेत. आरोग्य व्यवस्था कोलमडल्याने हजारो लोकांचे बळी जाताहेत. मंदिरात प्रवेशाला बंदी आहे. मुख्यमंत्री घरातच बसून काम करत असल्यामुळे जनतेत नाराजी आहे. रेल्वे सेवा सुरू नसल्याने लोकांच्या प्रवासाचे हाल होताहेत. या सगळ्या परिस्थितीवरून लक्ष हटविण्यासाठी म्हणून ज्या व्यक्तीच्या वक्तव्याला पाच पैशांची किंमत नाही, तिला किंमत दिली जातेय,’ असेे देशपांडे यांनी म्हटले आहे.

‘कंगना राणावत ही प्रसिद्धीसाठी वक्तव्य करणारी व्यक्ती आहे. प्रसिद्धीसाठी तिने फेकलेल्या जाळ्यात अडकण्याइतकी शिवसेना निर्बुद्ध नक्कीच नाही. पण मुद्दाम शिवसेना जाळ्यात अडकतेय का? लोकांना होणाऱ्या त्रासापासून सर्वांचं लक्ष हटावे, यासाठी हे सर्व सुरू असल्याचे देशपांडे यांनी म्हटले आहे.

‘मागील दोन महिने एका इंग्रजी आणि हिंदी वृत्तपत्राचे संपादक शिवसेनेचे वाभाडे काढत होते, तेव्हा संपूर्ण शिवसेना गप्प होती. मग आत्ताच या सगळ्याचा उद्रेक का होतोय? या षडयंत्रामागे कोण आहे याचाही विचार झाला पाहिजे. महाराष्ट्राची जनता सूज्ञ आहे,’ असेही त्यांनी म्हटले आहे.


Share this Newz