अंमली पदार्थांविरोधात विद्यार्थ्यांचा बुलंद आवाज; सरहद लॉ स्कूलमध्ये जनजागृती अभियान उत्साहात

Share this Newz

पुणे, प्रतिनिधी : जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सरहद लॉ स्कूल येथे “अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान” उत्साहात पार पडले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळाच्या निर्देशानुसार या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, महाराष्ट्र राज्य, पुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विविध स्वयंसेवी संस्था तसेच सक्षम भारत अभियानांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. युवकांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती निर्माण करणे आणि भारत सरकारच्या ‘नशामुक्त भारत अभियान’ संकल्पनेला बळकटी देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
यावेळी प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक दुष्परिणाम यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच व्यसनाधीन व्यक्तींना मदत करण्याचे मार्ग, समुपदेशनाचे महत्त्व, व्यसनमुक्ती केंद्रांची भूमिका आणि या समस्येविरोधात समाजाने एकत्रितपणे कार्य करण्याची गरज यावरही प्रकाश टाकला.
मोहिमेअंतर्गत आयोजित घोषवाक्य, पोस्टर, निबंध आणि रील स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ‘अंमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि त्या विळख्यात सापडलेली तरुणाई’ या विषयावर विद्यार्थ्यांनी सर्जनशील सादरीकरणातून प्रभावी संदेश दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी अंमली पदार्थांपासून दूर राहण्याची तसेच समाजात जनजागृती करण्याची सामूहिक शपथ घेतली.
संस्थेचे विश्वस्त अनुज नहार आणि प्राचार्या सत्यवती खळदकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी विकास अधिकारी कौशल बागुल, ग्रंथपाल मनीषा जगताप तसेच सहायक प्राध्यापक सागर घोळवे, स्वाती डिंबर, उत्कर्षा धुमाळ आणि आकाश गपाट उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांविषयी जागरूकता निर्माण झाली असून निरोगी, व्यसनमुक्त आणि जबाबदार समाज घडविण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. तसेच भविष्यात अशा जनजागृतीपर उपक्रमांची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.


Share this Newz