ई-कॉमर्ससाठी सरकारने जारी केले नवे नियम

Share this Newz

नवी दिल्ली :

  केंद्र सरकारने ई-कॉमर्स कंपन्यांशी संबंधित नवीन नियम (New rules of e-commerce) जारी केले आहेत. यासाठी सरकारने Consumer Protection (E-Commerce) Rules 2020 जारी केला आहे. याअंतर्गत सर्व नियम आणि कायदे तयार केले आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास Consumer Protection Act, 2019 अंतर्गत कडक कारवाई करण्यात येणार आहे. २० जुलैला ग्राहक व्यवहार सचिव लीना नंदन यांनी नियमावली तयार असल्याचं स्पष्ट केलं होतं. नियम अशा पद्धतीने तयार केले आहेत की, ग्राहकांना याचा फायदा होईलच यासोबतच ई-कॉमर्स पॉलिसीवर कोणताही परिणाम होणार नाही. जाणून घेऊयात नव्या नियमांमुळे ग्राहकांना काय फायदा होणार आहे.

उत्पादन कुठे तयार झालं याची द्यावी लागणार माहिती

आता ई-कॉमर्स कंपन्यांना आपल्या प्लॅटफॉर्मवर मिळणाऱ्या उत्पादनांवर ते कुठे तयार झालं आहे हे लिहिणं आवश्यक आहे. जी ई-कॉमर्स कंपनी असं करणार नाही, त्या कंपनीविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे आता वस्तू विकत घेण्यापूर्वी ते कुठे तयार झालं आहे हे कळणार आहे.

उत्पादन कुठे तयार झालं हे नमूद करण्याची आवश्यकता का ?

केंद्र सरकारने प्रत्येक वस्तूवर ती कुठे तयार झाली आहे ते ठिकाण वस्तूवर नमूद करणे बंधनकारक केले आहे कारण ग्राहक हे स्वत: ठरवू शकतील की, वस्तू विकत घ्यायची का नाही. चीनच्या वस्तूंवर बहिष्कार करण्याच्या मागणीच्या वेळी सरकारने घेतलेला हा निर्णय चीनला मोठ्या प्रमाणात नुकसानकारक ठरणार आहे आणि यामुळे ग्राहकाला खरेदी करताना याची मदत होणार आहे.

ही माहितीही देणं गरजेचं

वस्तूवर असलेली उत्पादनाची तारीख, वैधता कालवधी, परतावा, बदली करणे, वॉरंटी, ग्यारंटी या माहितीसह डिलेवरी आणि पाठविणाऱ्याची माहितीही द्यावी लागणार आहे. सोबतच ग्राहकाला आपला निर्णय घेण्यासाठी एखाद्या अन्य माहितीची आवश्यकता असेल तर ई-कॉमर्स कंपनीला ती माहिती ग्राहकाला देणं गरजेचं आहे.

नव्या नियमानुसार ई-कॉमर्स वेबसाइटला ग्राहकाने ऑर्डर रद्द केल्यानंतर कोणतेही पैसे आकारता येणार नाहीत. म्हणजेच एखादी वस्तू नोंद केल्यानंतर ती तुम्ही रद्द केली तर ई-कॉमर्स साइट पैसे मागणार नाही. असे केल्यास ते नियमांचे उल्लंघन समजले जाईल. 

नवीन नियमानुसार ई-कॉमर्स वेबसाइट किंमतीबाबत ग्राहकांची फसवणूक करू शकणार नाही. अधिक फायदा कमावण्याच्या उद्देशाने चुकीची किंमत घेता येणार नाही तसेच ई-कॉमर्स कंपन्यांना ग्राहकांसोबत कोणत्याही प्रकारचा भेदभाव करता येणार नाही.

ई-कॉमर्स वेबसाइट्सला कोणत्या पद्धतीने पैसे घेणार हे सांगावे लागणार आहे. या पैसे घेण्याच्या पर्यांयाच्या सुरक्षेबाबतही सांगावं लागणार आहे तसेच सोबत इतर माहितीही द्यावी लागेल. जी पैसे घेण्यासाठी आवश्यक आहे. सेवा पुरवठादाराचीही माहिती देणे गरजेचे आहे.

ई-कॉमर्स वेबसाइटला नव्या नियमांनुसार विक्रेत्याची संपूर्ण माहिती देणे गरजेचे आहे. यामध्ये त्याला व्यवसायाचे नावही द्यावे लागेल तसेच त्याची नोंदणी केली आहे हे सांगावे लागेल. विक्रेत्याचा पत्ता, ग्राहक संपर्क क्रमांक आणि त्यानुसार देण्यात आलेली रेटिंग्सही दाखवावी लागणार आहे.

नव्या नियमानुसार ग्राहकांकडून करण्यात येणाऱ्या तक्रारींचीही काळजी घेण्यात आली आहे. नियमांनुसार ई-कॉमर्स वेबसाइटला प्रत्येक तक्रारीसोबत तिकिट नंबरही देणे गरजेचे आहे, ज्याच्या मदतीने ग्राहक आपल्या तक्रारीची स्थिती माहिती करून घेऊ शकेल.


Share this Newz