द न्यूज बिझ टाईम्स, पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव परिसरातील काटेपुरम चौकात झालेल्या अनधिकृत फेरीवाल्या विरोधातील कारवाईचा राग मनात ठेवून कारवाई झालेल्या ठिकाणाच्या इमारतीच्या मालकाने बातमी का दिली, असा जाब विचारत पत्रकारास शिवीगाळ करत धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी घडला.
समाजातील गैरप्रकार अनुचितबाबी,सामाजिक समस्या,नागरी समस्या प्रशासनाच्या लक्षात आणून देण्याचे कार्य हे पत्रकार नेहमीच करत असतात. त्याचप्रमाणे या परिसरातील पदपथावर मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण बातमीच्या माध्यमातून दैनिक पुढारीचे पत्रकार संतोष महामुनी यांनी मांडले होते.
यामध्ये वृत्तांकन करताना कोणत्याही वैयक्तिक हेतू पुरस्करपणे बातमी दिली नसताना सुद्धा त्यांच्यावर संबंधित जागा मालकाने आरोप करत शिवीगाळ करत तसेच माझा भाऊ नामांकित दैनिकात उपसंपादक आहे मी ही पाहतो असे म्हणत सार्वजनिक ठिकाणी धमकी देण्याचा निंदनीय प्रकार घडला आहे.
पिंपळे गुरव परिसर स्मार्ट सिटीत समाविष्ट असतानाही झालेले चकाचक मोठे पदपथ हे अनधिकृत फेरीवाले, वाहन चालकांकडून गिळंकृत करण्याचा भयावह प्रकार सुरू आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी ची कोट्यावधी रूपये खर्चून केलेली कामे ही फक्त कागदोपत्री दिखाव्यासाठी आहेत का? असा सवाल सामान्य नागरिक करत आहेत.
लहान मुले, शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना पदपथ असतानाही तो अतिक्रमणामुळे गिळंकृत झाल्याने रस्त्यावरून जीव मुठीत धरून चालावे लागते. परिणामी झालेले पदपथ ही येथील नागरिकांसाठी शोभेची वस्तूच बनल्याचा प्रकार झाला आहे.
त्यामुळे प्रशासनाने ही अशा पदपथांवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार होत आहे
या बातमीमुळे माझ्या दुकानासमोरील फेरीवाल्याचे दुकान उचलले, असा प्रति आरोप करण्याचा प्रकार म्हणजे गैरप्रवृत्तीला स्पष्टपणे समर्थन करण्याचा गंभीर प्रकार आहे. त्यामुळे अशा नागरिकांमध्ये प्रशासनाचा वचक आहे की नाही, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होण्याची भीती नाकारता येत नाही. त्यामुळे वेळीच अशा गैरप्रकारांवर लक्ष देऊन त्याला आळा घालण्याची जबाबदारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची असल्याचेही बोलले जात आहे.
संबंधित प्रकरणाची माहिती पत्रकाराने सांगवी पोलीस प्रशासनास दिली व पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षण मिळावे ही मागणीही केली त्यावर रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती.
सांगवी पोलीस स्टेशन मध्ये पत्रकाराने जीवितास कोणती हानी होऊ नये यासाठी सुरक्षिततेचा उपाय म्हणून तक्रार दाखल केली मात्र त्यावर कारवाई करताना सांगवी पोलीस स्टेशन कडून तब्बल चार तास लावण्यात आले त्यामुळे पत्रकारांची ही अवस्था असेल तर सामान्य नागरिकांच्या तक्रारीची काय अवस्था असेल असेही वर्तुळातून बोलले जात आहे.
संबंधित घटना घडल्यानंतर स्थानिक पत्रकारांनी ही एकजूट दाखवत पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला तसेच आपले म्हणणे सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांच्यासमोर मांडले त्यावर त्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
सामाजिक प्रश्न आपल्या लेखणीतून मांडणाऱ्या पत्रकारांना धमकावणे ही बाब गंभीर असून सांगवी पिंपळे गुरव परिसरातील पत्रकारांच्या पाठीशी पिंपरी चिंचवड शहरातील मनसे पदाधिकारी असून झालेला हा प्रकार निंदनीय आहे.
-सुरेश सकट, उपविभाग अध्यक्ष मनसे.
Leave a Review