नवी सांगवीत पं.दिनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

कौशल्य विकास रोजगार विभागीय आयुक्तालय, प्रतिभा महिला प्रतिष्ठान व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन 
Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी :     रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग कौशल्य विकास रोजगार विभागीय आयुक्तालय पुणे व प्रतिभा महिला प्रतिष्ठान, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू मिलेनिअम इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पं.दिनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यास विविध परिसरातून आलेल्या इच्छुक उमेदवारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पाच हजारांहून अधिक इच्छुक उमेदवारांनी नोंदणी करून या सुवर्णसंधीचा लाभ घेतला. अकराशेपेक्षा जास्त जणांना “ऑन द स्पॉट” नोकरी मिळाली. भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आली. तसेच या मेळाव्याच्या माध्यमातून ५१ दिव्यांगांना नोकरी उपलब्ध झाली.

नवी सांगवी येथील द न्यू मिलेनिअमय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात पुण्यासह कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील औद्योगिक, तसेच इतर सेवा क्षेत्रातील खासगी उद्योगांकडील सुमारे आठ हजार रिक्त पदांसाठी भरती केली जाणार होती. मेळाव्यासाठी सुमारे ६ हजार जणांनी नोंदणी केली होती. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी आमदार उमा खापरे,भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी नगरसेवक शंकर जगताप, माजी महापौर माई ढोरे, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागाच्या उपायुक्त अनुपमा पवार, सहाय्यक आयुक्त सागर मोहिते, माजी उपमहापौर नानी घुले, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र राजापुरे, विलास मडिगेरी, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी नगरसेविका सविता खुळे, अश्विनी चिंचवडे, उषा मुंढे, माधवी राजापुरे, आरती चोंधे, शारदा सोनवणे, निर्मला कुटे, संगीता भोंडवे, मनिषा पवार, माजी नगरसेवक सागर आंगोळकर, अंबरनाथ कांबळे, बाबासाहेब त्रिभुवन, शशिकांत कदम, हर्षल ढोरे, मोरेश्वर शेडगे, राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, बाळासाहेब ओव्हाळ, संदिप कस्पटे, विनायक गायकवाड, अभिषेक बारणे, महेश जगताप, विभीषण चौधरी, संदीप गाडे, गोपाळ माळेकर, भाजप महिला आघाडी शहराध्यक्षा उज्ज्वला गावडे, भाजपचे प्रदेश सदस्य अमित गोरखे, युवकचे प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, प्रमोद ताम्हणकर, योगेश चिंचवडे, विनोद तापकीर, माऊली जगताप, शेखर चिंचवडे, डॉ. गणेश अंबिके आदी उपस्थित होते.

५१ नामांकित कंपन्या व उद्योजकांचा सहभाग
या मेळाव्यात पुण्यासह कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील ५१ नामांकित कंपन्या व उद्योजकांनी सहभाग घेतला. प्रत्येक कंपनीच्या स्टॉलवर संबंधित अधिकाऱ्यांनी थेट मुलाखती घेऊन कागदपत्रे तपासल्यानंतर पात्रतेनुसार नियुक्तीपत्रे बहाल केली. यामध्ये आठवी पास झालेल्यांपासून ते डिप्लोमा, डिग्री केलेल्या बेरोजगारांना नोकरी मिळाली. प्रत्यक्षात अकराशेपेक्षा जास्त जणांना नियुक्ती मिळाली असली, तरी या मेळाव्यातून आणखी शेकडो जणांना नोकरी मिळणार आहे. संबंधित कंपन्यांकडून त्याची प्रक्रिया सुरू आहे.

बेरोजगार दिव्यांगानाही मिळाली नोकरी
दिव्यांगांनाही रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी रोजगार मेळाव्यात विशेष कक्ष उभारण्यात आला होता. मेळाव्यात रोजगार मिळावा म्हणून ८४ दिव्यांगांनी नोंदणी केली होती. त्यातील ५१ दिव्यांगांना नोकरी मिळाली. त्यांना जागेवरच नियुक्तीपत्र देण्यात आले.

पिंपरी-चिंचवडमध्ये लवकरच कौशल्य विकास केंद्र
या मेळाव्यात बोलताना शंकर जगताप यांनी बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळवून देतानाच त्यांच्यामध्ये स्वयंरोजगाराची कौशल्ये विकसित करून समाज व राज्यास प्रगतीपथावर नेण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचे सांगितले. स्वयंरोजगाराच्या कौशल्यातूनच व्यवसाय निर्मितीला चालना मिळणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये लवकरच कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
———————————

प्रत्येकाच्या हाताला काम मिळावे, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. त्यासाठी शासनस्तरावर देखील प्रयत्न सुरू आहेत. पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड मोठ्या प्रमाणात कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये मनुष्यबळाची आवश्यकता असते. मात्र, ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचत नाही. त्यासाठी राज्य शासनाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यामध्ये सातवी ते पदव्युत्तर, आयटीआय पासून ते अभियंता पदवी घेतलेल्या तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करण्यात आल्या होत्या. मेळाव्यामध्ये सात हजार तिनशेहून अधिक रिक्त जागा भरण्यात येणार होते. त्यामुळे बेरोजगार तरुण, तरुणींनी येथील रोजगार मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

           -शंकर जगताप, भाजपा चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख


Share this Newz